जळगावात वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:30 PM2019-05-26T17:30:22+5:302019-05-26T17:33:02+5:30
वीज बील थकल्यामुळे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी १०.१५ वाजता विटनेर, ता.जळगाव येथे घडला. याप्रकरणी वायरमन अमोल विष्णू भागवत (३०, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन योगेश रमेश वराडे याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : वीज बील थकल्यामुळे वीज कनेक्शन कापायला गेलेल्या वायरमनला धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी सकाळी १०.१५ वाजता विटनेर, ता.जळगाव येथे घडला. याप्रकरणी वायरमन अमोल विष्णू भागवत (३०, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरुन योगेश रमेश वराडे याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी दररोज पाच वीज थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्याचे आदेश वायरमन व शाखा अभियंत्यांना दिले आहेत. कनेक्शन कापले नाही तर संबंधित कर्मचा-याचे वेतनच रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वायरमन विष्णू भगत हे रविवारी सकाळी सहका-यांसह वावडदा कार्यक्षेत्रातील विटनेर येथे थकबाकीदारांकडे गेले असता योगेश वराडे यांचे कनेक्शन कापण्याच्या तयारीत असताना कुटुंबाने वाद घातला. भगत यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे तालुक्यातील १० ते १५ वायरमन एकत्र येऊन एमआयडीसी पोलिसात आले होते. त्यांनी वराडे याच्याविरुध्द तक्रार दिली.
प्रशासनाच्या निर्णयाला कर्मचा-यांचा विरोध
एमआयडीसी पोलिसात आलेल्या कर्मचा-यांनी महावितरण प्रशासनाच्या निर्णयालाही विरोध दर्शविला. एखादी थकबाकीदार जागेवर थकबाकी भरत असेल तरीही त्या ग्राहकाचे वीज कनेक्शन कापले जात आहे, त्यामुळे ग्राहक व कर्मचारी यांच्यात वाद उद्भवत आहेत. कनेक्शन कापले नाही तर वेतन रोखले जाणार असल्याने कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. धुळे जिल्ह्यात उन्हामुळे सकाळी ७ ते १०.३० या वेळेत वसुली व कनेक्शन कापण्याची मोहीम राबविण्याचे आदेश स्थानिक अधिका-यांनी दिले आहेत. जळगावात मात्र भर उन्हात कर्मचा-यांना पोलवर चढून कनेक्शन कापण्याचे आदेश आहेत. वातानुकुलित यंत्रात बसणा-या अधिका-यांकडून तडपत्या उन्हात कर्मचा-यांकडून काम करुन घेतले जात असल्यानेही कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली.