विश्वासघातकी भाजपला दूर ठेवून ‘मविआ’शी जुळवून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:13 AM2020-12-26T04:13:33+5:302020-12-26T04:13:33+5:30
जळगाव : गेली २५ वर्षे भाजपसोबत एकत्र राहून सर्व निवडणुका आपण सोबत लढविल्या, मात्र या मित्राने नेहमी शिवसेनेसोबत कपटपणा ...
जळगाव : गेली २५ वर्षे भाजपसोबत एकत्र राहून सर्व निवडणुका आपण सोबत लढविल्या, मात्र या मित्राने नेहमी शिवसेनेसोबत कपटपणा वागला. त्यामुळे राज्याच्या भल्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
भाजपने दिलेल्या दगाफटक्याला उत्तर देण्याची वेळ आली असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासघातकी भाजपला धडा शिकवा, अशा सूचना नेत्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी ताकत कमी असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी जुळवून घ्या, अशाही सूचना सेना नेत्यांनी दिल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी लेवा भवन येथे करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, शहर संघटक दिनेश जगताप, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, गटनेते अनंत जोशी आदी उपस्थित होते.
..तर खासदार शिवसेनेचाच होईल : गुलाबराव पाटील
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातही आपले दोन आमदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या, हे सांगायची शिवसैनिकाला गरज नाही. म्हणूनच वर्षानुवर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊन जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, त्यात आपल्या ताकदीचा फायदा होईल असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकत पाहता पुढील खासदार देखील शिवसेनेचाच होईल, अशी खात्रीही गुलाबराव पाटील यांनी दिली.
नेत्यांनी जुळवून घेतले कार्यकर्त्यांनीही जुळवून घ्यावे : संजय सावंत
ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ही निवडणूक पक्षविरहित मानली जात असली तरी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या
कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. आता आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. ज्यांच्याशी आपण अनेक वर्षे मैत्री केली,
त्यांनी आपला विश्वासघात केला आहे. आता आपण आजवर विरोधक असलेल्या पक्षांसोबत आहोत. विश्वासघात करणाऱ्यांशी आपल्याला लढायचे आहे, असे संजय सावंत यांनी सांगितले. मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी जुळवून घेतले असून, आता कार्यकर्त्यांनींही जुळवून घ्यावे असेही आवाहन सावंत यांनी केले.
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जरूर प्रयत्न करू. पण ज्या ठिकाणी अडचणी आहेत, आपली ताकद कमी आहे, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा.
यावेळी सरपंचाचे आरक्षण निकालानंतर कळणार असल्याने ‘''ब्लाइंड गेम’ खेळावा लागणार आहे. आजवर आपण भाजपसोबत होतो. पण भाजपने आपला विश्वासघात केला आहे. आपला प्रमुख शत्रू भाजप आहे, हे लक्षात घ्या, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. चिमणराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना ग्रा.पं.निवडणुकीत तयारी करण्याचा सूचना दिल्या. यावेळी तालुकांप्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.