मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:26+5:302021-04-20T04:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध ...

The quality of food in the Corporation's Kovid Center has deteriorated | मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असल्याच्या तक्रारी याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत सोमवारी देखील अनेक रुग्णांनी या ठिकाणच्या जेवणाचा दर्जा बाबत तक्रारी करत अनेकांना जेवणच दिले जात नसल्याचा आरोप काही रुग्णांनी केला आहे.

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही नागरिकांना जेवण, नाश्ता उपलब्ध होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते अशा तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्याच तक्रारी येत असल्याने सोमवारी दुपारी नगरसेवक कैलास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे यांच्यासह जाऊन पाहणी केली. कोविड रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कैलास सोनवणे यांनी लागलीच महापौरांशी याबाबत संवाद साधला. तसेच मनपा अधिकारी शुक्ला व नाष्ट्ये यांना बोलावून घेतले.

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा भांडारपालला विचारणा केली असता जेवणाचा मक्ता पूजा केटरर्सला दिला असून प्रति व्यक्ती प्रति दिवस १४० रुपये प्रमाणे खर्च दिला जातो. मक्तेदाराने दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता आणि फळे देण्याचे त्यात नमूद असल्याची माहिती त्याने दिली. फळे केवळ केळी द्यावी का? जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी का? पार पाडली जात नाही याबाबत नगरसेवक सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच नागरिकांची तक्रार लेखी घेऊन मनपा आयुक्तांना कळवावे, असेही सोनवणे यांनी सांगितले.

३०० रुग्ण असताना ही जेवण बेचव

मनपाचा कोविड केअर सेंटर मध्ये सद्यस्थितीत ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल १४०० हून अधिक बेड खाली आहेत. मात्र अशा परिस्थितीतदेखील या ठिकाणच्या रुग्णांना व्यवस्थित जेवण दिले जात नसल्याने अनेक रुग्ण आता गृह विलगीकरणाचे मागणी करत आहेत. महापालिका प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यानेच अनेक रुग्ण घरीच जाऊन उपचार घेणे पसंत करत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Web Title: The quality of food in the Corporation's Kovid Center has deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.