खेळाडूंची गुणवत्ता शासन निर्णयाने झाकोळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:17 AM2021-03-26T04:17:16+5:302021-03-26T04:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने खेळाडूंच्या दहावी आणि बारावीच्या क्रीडा गुणांमध्ये किमान सहभागाची अट टाकली आहे. त्यामुळे खेळाडूंना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण दिले जातात. त्यात संबंधित विद्यार्थ्याने सहावी ते बारावी या काळात कधीही ते जिल्हा ते आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळवले असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र २५ जानेवारी २०१९ च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहावी आणि बारावीत विद्यार्थ्याने स्पर्धेत किमान सहभाग घ्यावा, अशी अट टाकण्यात आली आहे, तसेच जिल्हास्तर प्राविण्य पाच गुण, विभागस्तर सहभाग पाच तर प्राविण्य १० गुण, राष्ट्रीय स्तरावर सहभाग १५ आणि प्राविण्य २० तर राज्य स्तरावर प्राविण्य मिळवले तर १५ गुण मिळतात; मात्र यंदा वर्षभरात एकही क्रीडा स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे एकाही खेळाडूला गुण मिळतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आतापर्यंत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.
खेळाडूंमध्ये नाराजी
यंदा लॉकडाऊनमुळे खेळाडू वर्षभरापासून घरातच आहेत, तसेच राज्यात शासनाची एकही आंतरशालेय स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे शासननियमानुसार एकाही खेळाडूला यंदा क्रीडा गुण मिळणार नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीला असलेल्या खेळाडूंना क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. मागील चार ते सहा वर्षात त्यांनी कितीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या असल्या तरी यंदा त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रीडा शिक्षक महासंघाचे प्रयत्न सुरू
महाराष्ट्र राज्य आणि जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा संघटनेचे राजेश जाधव, डॉ. प्रदीप तळवेलकर यांनी राज्य संघटनेच्या माध्यमातून क्रीडा व युवक कल्याण विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला आहे.
२०१९-२० मध्ये आलेले प्रस्ताव
एकूण प्रस्ताव १६२२
दहावी - मुले ५५१
मुली ४३५
बारावी मुले- ४०४
मुली -२३२
२०२०-२१ मध्ये अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही.
कोट - नववी आणि अकरावीला असताना जे खेळले आहेत. जे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले होते. त्यांना दहावी आणि बारावीला खेळले आहेत, असे गृहित धरून क्रीडा गुण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. - डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा शिक्षक
कोट - खेळाडूंच्या हिताचा विचार करून शासनाने गुण द्यायला हवेत. त्यासाठी यंदा हे नियम शिथिल करावे. शासनाने खेळाडूंना गुण दिले तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल नक्कीच वाढेल - प्रवीण पाटील, क्रीडा शिक्षक