मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:04 AM2019-02-18T11:04:19+5:302019-02-18T11:06:02+5:30

चोरुन चित्रिकरण : राष्ट्रीय सुरक्षा संस्था, पोलीस व विमानतळ प्रशासन यंत्रणा पडली उघडी

Question about Modi's security system! | मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह !

मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह !

Next
ठळक मुद्देपुलवामा घटनेनंतरही गांभीर्य नाही


जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारच्या जळगाव विमानतळावरील आगमनप्रसंगी चोरुन काढण्यात आलेल्या व्हीडीओमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाच्यावेळी सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांचे मोबाईलमध्ये चोरुन चित्रिकरण केले. हा व्हीडीओ शनिवारी व्हायरल झाला तशी सुरक्षा यंत्रणेचेही धिंडवडे निघाले आहेत.
एकीकडे जळगावच्या विमानतळ परिसरात सर्वत्र पोलिसांचा मोठा ताफा होता. कडक सुरक्षा यंत्रणा होती. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही मीडियाच्या पत्रकारांना देखील दूर ठेवण्यात आले होते. तेथे फक्त तीन शासकीय छायाचित्रकारच दिसून येत होते. पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री हे तीन व्यक्ती तर अतिमहत्वाचे म्हणून ओळखले जातात.
पोलीस अधीक्षक, आमदार समोरच
विमानाजवळ पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यासह राष्टÑीय सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी बाहेर थांबलेले दिसून येत आहे. महापौर व आमदार मोदींचे चरणस्पर्श करतात तर पोलीस अधीक्षकांनीही त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
काश्मिमधील पुलवामाच्या घटनेनंतर देशात सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली. मात्र, ज्या ठिकाणी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या आणि अतिउच्च पदावर असलेल्या व्यक्ती आहेत; त्या ठिकाणची सुरक्षा कशी असावी आणि जळगाव येथे मात्र त्याकडे किती गांभीर्याने बघितले जात आहे, हे या व्हिडीओतून अधोरेखित होत आहे. या व्हिडीओमुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाईपाच्या आडून चित्रण
मोदींचे विमान व व्हिडीओ चित्रण करणाºयांचे अंतर दोनशे मीटर इतके असतानाही सुरक्षा यंत्रणांना ही व्यक्ती दिसू नये याचे मोठे आश्चर्य आहे. चित्रण करताना ते एकमेकांशी बोलत आहेत. कोणी अडचणीत येवू नये म्हणून खबरदारी घेण्याबाबतही त्यांच्यात चर्चा होत आहे. विमानतळ प्रशासन, राष्टÑीय सुरक्षा यंत्रणा व पोलीस असे तिन्ही विभाग या घटनेतून उघडे पडले आहेत. दुर्देवाने मोठी घटना घडली असती तर त्याला कोण जबाबदार राहिले असते, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Question about Modi's security system!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.