महाविद्यालयीन सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:02 PM2019-07-01T12:02:10+5:302019-07-01T12:04:22+5:30
पालकांमध्ये भिती : किरकोळ कारणावरून होताहेत चाकू हल्ले ; सुरक्षा वाढविण्याची मागणी
जळगाव : फक्त दुचाकीचा धक्का लागला म्हणून मू़ जे़ महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात मुकेश सपकाळे (रा़ आसोदा) या तरूणावर चॉपरने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे महाविद्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीला आहे़ किरकोळ घटनांकडे सुध्दा कानाडोळा करणाऱ्या महाविद्यालय व पोलिसांनी आता तरी झोपेतून उठून महाविद्यालय सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.
सध्या शहरात क्षुल्लक कारणावरून खून करणे, हाणामाºया करणे एवढेच नव्हे तर चाकू हल्ला करण्याच्या घटना ह्या नित्याच्याच झाल्या आहेत़ गु्रप करून गुंडगिरी करणारे तरूण महाविद्यालयांच्या परिसरात दहशत माजवितांना बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी तर जी.एस. ग्राऊंड व विधी महाविद्यालयाच्या परिसरातील मैदानावर शाळकरी मुलांमध्येही हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. तर नुतन मराठा महाविद्यालयात सुध्दा किरकोळ कारणावरून हाणामारीची घटना घडली होती़ आता तर महाविद्यालयातील विद्यार्थी नसताना त्या महाविद्यालयात थांबून किरकोळ कारणावरून खून होत असल्यामुळे महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ अनेकवेळा किरकोळ वाद होतात, हाणामा-या होतात, पण महाविद्यालय दुर्लक्ष करतात. आता तरी महाविद्यालयांनी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी होत आहे.
याला जबाबदार कोण?... शहरातील मोजक्या काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आत प्रवेश दिला जातो व काही कार्यालयीन कामासाठी आलेल्या इसमांना सुध्दा पास देऊन प्रवेश दिला जातो़ मू़ जे़ महाविद्यालय शहरातील मध्यभागी असल्याकारणाने या ठिकाणी टवाळखोर मुलांचा कायम वावर असतो़ महाविद्यालयीन प्रवेश नसतानासुध्दा ही मुले महाविद्यालयाच्या आवारात बिनधास्त वावरत असतात़ यावेळी महाविद्यालयीन प्रशासन कारवाई करण्यास कानाडोळा का करते, असा सवाल युवाशक्ती फाउंडेशनकडून उपस्थित करण्यात आला.लवकरच महाविद्यालयीन निवडणूका जाहीर होतील, त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे पूर्णपणे पालन व्हावे, यासाठी युवाशक्ती फाउंडेशनचे पदाधिकारी ३ जुलै रोजी कुलगुरूंची भेट घेणार आहे.
विश्वास आणि सुरक्षा आहे, या कारणाने विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये वावरतात़ मात्र, महाविद्यालयात चॉपर व चाकू घेऊन विद्यार्थी फिरतात, तर महाविद्यालय प्रशासनाचा कुठलाही दबाव यातून दिसून येत नाही़ महाविद्यायाने सुरक्षा संदर्भात योग्य काळजी घ्यावी.
- सिध्देश्वर लटपटे, प्रदेश सहमंत्री़, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
खुनाची घटना अत्यंत दु:खद आहे. सुरक्षारक्षक असताना क्षुल्लक कारणांवरुन एका मुलाचा जीव गमवावा लागतो. तोपर्यत सुरक्षा रक्षक कुठे होते. सीसीटीव्ही कमेरे असताना महाविद्यालय प्रशासनाचे लक्षात आले नाही. गुंडप्रवृत्तीच्या इसमांवर कठोर कारवाई व्हावी.
-अॅड़ रूपसिंग वसावे, माजी जिल्हाध्यक्ष़ आदिवासी एकता परिषद
महाविद्यालयाच्या आवारात झालेला प्रकार स्तब्ध करणारा आहे़ हा प्रकार युवकांमध्ये वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीचं लक्षण आहे़ अशी घटना महाविद्यालयात घडणार नाही याची जबाबदारी म्हणुन महाविद्यालयाकडून उचित पाउले उचलावीत -विकास मोरे, राज्यकारिणी सदस्य, सत्यशोधक विद्यार्थी संघटना
पोलीस प्रशासनाचा कुठलाही नियंत्रण व दबाव राहिलेला नसून शहरात गुन्हेगारीवृत्ती वाढली आहे़ महाविद्यालयीन परिसरात गस्तीसुध्दा कमी आहेत़ पालक मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांची बैठक घेणे आवश्यक होते़ मात्र, तसे झाले नाही़ आता तरी त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे ही मागणी आहे़
- देवेंद्र मराठे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस विद्यार्थी संघटना
या घटनेमुळे पोलिसांचा धाक संपला की काय हा प्रश्न उपस्थित होतो़ संबंधित महाविद्यालयाने आता तरी सक्तीने ओळखपत्र तपासून विद्यार्थ्यांना आत प्रवेश द्यावा़ विद्यार्थ्यांना आपले प्राध्यापक कोण हे माहिती नाही, त्यामुळे प्राध्यापक विद्यार्थ्यांमधील संवाद वाढायला हवा़
-विराज कावडीया, संस्थापक़ युवाशक्ती फाउंडेशन
खून प्रकरणात पोलिसांना हवे ते सहकार्य महाविद्यालयाकडून करण्यात येणार आहे़ तसेच सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते पाऊल महाविद्यालयाकडून उचलण्यात येणार आहेत़
- अॅड़ प्रकाश पाटील, उपाध्यक्ष़ केसीई सोसायटी.