आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणांवर प्रश्नचिन्ह, जळगाव जिल्ह्यात ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:09 PM2020-02-19T12:09:34+5:302020-02-19T12:10:11+5:30
साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी, ‘सिकलसेल’चा आकडा वाढण्याची शक्यता
जळगाव : जिल्ह्यात आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून राबविलेल्या तपासणी मोहीमेंतर्गत अद्याप साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी असून सिकलसेल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ यात भरात भर म्हणजे ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया असल्याचेही समोर आले आहे़
लालमाती आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे त्यानंतर प्रथमच आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्थेकडून तपासणी मोहीम राबविली असता यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आलेले आहे़त. जिल्ह्यात अद्याप साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची तपासणी बाकी असून सिकलसेल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय सल्ला मागितला आहे़ ७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया असल्याचेही समोर येत आहे़
जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा रूग्णालयातर्फे संयुक्तपणे सिकलसेची तपासणी केली होती़ या तपासणीनुसार गेल्या वर्षभरात केवळ दहा नवे रूग्ण समोर आले होते़ अकरा वर्षातील हा आकडा अडीचशेपर्यंत मर्यादीत होता़ मात्र, त्रयस्थ संस्थेकडून केवळ आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर साडे नऊ हजार विद्यार्थ्यांच्या तपासणीत २ हजार विद्यार्थ्यांना सिकलसेल असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे़ हा अनुवंशिक आजार असल्याने आरोग्य विभागाला या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची आजपर्यंत गरज भासली नाही का? किंवा गेल्या ८ वर्षापासून होणारे सर्व्हेक्षण हे केवळ वरच्यावर होते का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत़ गेल्या वर्षी हिवताप विभागाच्या सर्व्हेक्षणातून जिल्ह्यात केवळ एकच हिवतापाचा रूग्ण असल्याचा निष्कर्ष समोर आला होता़ डेंग्यू, हत्तीरोग इत्यादींबाबतच्या सर्व्हेक्षणातून समोर येणारी आकडेवारीही व खासगी रूग्णालयातून समोर येणारे रिपोर्ट यामध्येही तफावत असल्याने या सर्व सर्व्हेक्षणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़
७० विद्यार्थ्यांना थॅलेसिमिया
त्रयस्थ संस्थेने चौदा दिवसात केलेल्या सर्व्हेक्षणातून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत़ यात ७० विद्यार्थी थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे़ आदिवासी विकास विभागामार्फे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात असताना जिल्ह्यातील ही आकडेवारी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे़
उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी होणार का?...
आरोग्य विभागाने त्रयस्थ संस्था एचएलएल कडून हे सर्व्हेक्षण करून घेतले आहे़ यात अनेक विद्यार्थ्यांचे रक्तनमुने घ्यायचे बाकी असून पुन्हा एकदा रक्त तपासणी होणार आहे़ अशा स्थितीत ९ हजार विद्यार्थ्यांच्या सर्व्हेक्षणाचा खर्चच एक ते दीड कोटीच्या घरात गेल्यामुळे आता आरोग्य विभाग उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी करणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
आदिवासी विकास विभागाची रूग्णवाहिका असून त्याद्वारे नियमित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. मात्र यंदा प्रथमच सिकलसेलबाबत तपासणी करून घेण्यात आलेली आहे़ आम्ही आजच जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देऊन नेमकी आकडेवारी व उपायोजनांबाबत वैद्यकीय सल्ला मागितला आहे़
-विनिता सोनवणे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी