रावेर उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 01:54 PM2020-11-19T13:54:59+5:302020-11-19T13:55:22+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयापासून सर्वाधिक लांब अंतरावर असलेल्या रावेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा देण्याची नितांत गरज आहे.
किरण चौधरी
रावेर : जिल्हा सामान्य रुग्णालयापासून सर्वाधिक लांब अंतरावर असलेल्या रावेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा देण्याची नितांत गरज आहे. असे असताना मात्र, रावेर लोकसभा क्षेत्रात जसजसे सत्ताधारी गटातील राजकीय वजनाचे झुकते माप वाढू लागले तसतशी चोपडा, मुक्ताईनगर व यावल येथील ग्रामीण रुग्णालयांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला आहे. किंबहुना, वस्तुस्थितीनुरूप प्राधान्यक्रमाने सर्वप्रथम रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देणे गरजेचे असताना मात्र रावेरला डावलण्यात आल्याने तालुकावासियांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रावेर तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून चोपडा, मुक्ताईनगर व यावल तालुक्यांपेक्षा भौगोलिक दृष्ट्या लांब अंतरावर आहे. असे असताना रावेर तालुक्यापेक्षा तत्कालीन नगरविकास मंत्री अरूणभाई गुजराथी हे सत्तारूढ असताना चोपडा येथे, जलसंपदा मंत्री पदावर एकनाथ खडसे आरूढ असताना मुक्ताईनगर, येथे तर आमदार शिरीष चौधरी हे तत्कालीन काँग्रेसच्या सत्ताधारी सरकारप्रसंगी जिल्ह्य़ातील एकमेव काँग्रेसप्रणित आमदार असताना यावल येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्याची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. तद्नंतर मात्र युतीच्या सत्तांतरामुळे त्यालाही मूर्त स्वरुप प्राप्त होऊ शकले नाही.
रावेर तालुका मध्य प्रदेश सीमेच्या टोकावर वसलेला आहे. मुंबई - दिल्ली लोहमार्ग व बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्य महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आपात्कालीन रूग्णांसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात अति दक्षता विभागासारख्या तातडीच्या सुविधा उपलब्ध होवू शकत नसल्याने बहुतांशी रूग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
विशेषतः रावेर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्यालगत आदिवासी बहुल वाडे, पाडे व तांड्यांचा समावेश असल्याने त्या भागातील गंभीर अत्यावस्थेतील रूग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यापूर्वीच आपले प्राण गमवावे लागतात.
सद्यस्थितीत महाविकास आघाडी सराकारमधील पालकमंत्री गुलाबराव पाटील व रावेर तालुक्याचे दोन्ही आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरी यांचा वैचारिक समन्वय केळी फळपीक विमा योजनेतील लढ्यात चांगला आढळून आल्याने तर माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच पक्षांतर झाले असल्याने रावेर तालुक्यातील जनसामान्यांमध्ये आरोग्याला प्राधान्यक्रम देवून महाविकास आघाडी सराकारवर दबावगट निर्माण करावा व रावेर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी प्रलंबित असलेल्या मागणी पुढे येत आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० बाह्यरुग्ण तपासणीचा भार राहत असून रावेर व निंभोरा पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यांसंदर्भात आरोपींची व जखमींची होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसह घात - अपघातातील रूग्ण व शवविच्छेदनाचा मोठा भार असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बहुतांश जागा रिक्त आहेत. शालेय आरोग्य तपासणी पथकांचे तथा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा रहाटगाडा हाकावा लागत असतो. तत्संबंधी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे.
-डॉ.एन.डी.महाजन, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, रावेर