पारोळ््यात जागेअभावी भाजीपाला विक्रेत्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 09:02 PM2019-08-31T21:02:06+5:302019-08-31T21:03:43+5:30
आंग्रे तलाव किंवा भुईकोट किल्ल्याचा पर्याय, कायमस्वरूपी हक्काची जागा देण्याची मागणी, मुख्याधिका-यांनी घेतली अॅक्शन
पारोळा : अनेक वर्षांपासून पिढीजात बाजारपेठत रस्त्याच्या कडेला विक्री करणा-या विक्रेत्यांना हक्काच्या जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. अतिक्रमणामुळे गेल्या तीन दिवसांपासून ठेलागाडीधारकांची विक्री बंद असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेने हा प्रश्न लावकरात लवकर सोडवावा, अशी मागणी भाजीपाला विक्रेते करीत आहेत.
उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या भाजीपाला विक्रेत्यांना भाडेकरार स्वरूपात जागा उपलब्धा करून द्यायला हव्यात. नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. मात्र, जे विक्रेते नगरपालिकेची परवानगी न घेता भर बाजारपेठेत रस्त्यामध्ये ठेलागाडी लावून भाजीपाला विक्री करतात त्यांच्यावर मात्र अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. यामुळे बाजारपेठेत कायमची शिस्त लागेल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा पट्टा आखून त्याच्या आत भाजीपाला दुकाने लावावीत. अन्यथा दंडात्मक कारवाईचे नियम करावेत. याबाबत दोन पर्यायांपैकी कोणताही अवलंबल्यास हा तिढा सुटू शकतो. पहिला असा की, आंग्रे तलावात हक्काची जागा दिल्यास त्यांचा जागेचा कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. या ठिकाणी भाडे करारनामा करून जागा उपलब्ध करून देता येऊ शकेल. तसेच भुईकोट किल्ल्यामध्ये एका बाजूला विक्रीसाठी जागा देऊन दररोज त्या जागेचे भाडेहीे घेता येईल. या उत्पन्नातून किल्ल्याचे जतन आणि संरक्षण करता येईल.
नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांचे नागरिकांनी कौतुक केले. बाजारपेठेतील अतिक्रमण ही शहराची गंभीर समस्या आहे. मात्र हा प्रश्न ते सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बाजारपेठेत भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकाने व ठेलागाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना जुने भाजीपाला मार्केट किंवा आंग्रे तलावात कायमस्वरूपी जागा देऊ.
-करण पाटील, नगराध्यक्ष
या प्र्रश्नाबाबत ३५० च्या वर जागा मागणी अर्ज आहेत. छाननी करून निकषात बसतील अशा १०० ते १२५ भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला जागा आखून दिली जाईल. त्यांनी छोटे दुकान लावून त्यांनी व्यवसाय करावा.
-विजयकुमार मुंडे, मुख्याधिकारी
भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वयानुसार डोक्यावर भाजीपाला घेऊन गलोगल्ली फिरणे शक्य नाही. त्यामुळे आम्हाला जागा विक्रीसाठी जागा द्यावी.
-आशा महाजन, भाजीपाला विक्रेत्या