दुय्यम निबंधक कार्यालयासमोर रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:09+5:302021-06-19T04:12:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण सातत्याने येत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण सातत्याने येत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. दिवसभर नागरिकांना थांबून रहावे लागत असल्याने कामे खोळंबून राहत आहेत.
मुद्रांक आणि दस्त नोंदणीसाठी नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. एप्रिल आणि मे महिन्यात कोविडच्या काळात जिल्ह्यात घरांच्या खरेदी-विक्रीसाठी केल्या जाणाऱ्या दस्त नोंदणीचे प्रमाण कमी झाले होते. आता ७ जूनपासून निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच गुरुवारी आणि शुक्रवारी तहसील कार्यालयासमोरील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होत आहे. काही वेळ येथे नागरिकांना सर्व्हरची अडचण असल्याचे सांगितले जात होते; मात्र जिल्ह्यातील इतर कार्यालयांमध्ये सर्व्हरची अडचण दिसून आली नाही. नंतर येथे कनेक्टिव्हिटीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. गेल्या ७ जूनपासून जिल्ह्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होत आहे. या आधीच्या एप्रिल आणि मे महिन्यात दस्त नोंदणीसाठी आधी वेळ घ्यावी लागत होती. सोबतच कोरोना आरटीपीसीआर किंवा अँटिजन चाचणी करावी लागत होती. त्यामुळेही अनेकांनी दस्त नोंदणी पुढे ढकलली होती. त्यामुळे ज्यांनी नोंदणीशी संबंधित कामे पुढे ढकलली होती. ते आता पुन्हा एकदा नोंदणीसाठी गर्दी करत आहेत.
नो मास्क नो फिजिकल डिस्टन्सिंग
गेल्या दोन दिवसांपासून येथे कनेक्टिव्हिटीची अडचण असल्याने या कार्यालयात शुक्रवारी ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याच परिसरात आधीच तहसील कार्यालय आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी उसळली होती. अनेक नागरिक, एजंट विनामास्क फिरताना दिसून येत होते. या गर्दीत कुणीही एकमेकांपासून पुरेसे अंतर पाळण्यास तयार नव्हते.