पाचोरा तहसीलला हयातीच्या दाखल्यांसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:47 PM2019-11-30T15:47:11+5:302019-11-30T15:48:57+5:30
संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध्दांनी पाचोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
आत्माराम गायकवाड
खडकदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव : संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी अपंग योजना व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्र्थींना दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचे दाखले सादर करावे लागत असल्याने वृध्दांनी पाचोरा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
अनेकांनी एकाच वेळी गर्दी केल्याने वृध्द महिला व पुरुषांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत दाखले सादर करण्याची मुदत असताना वृध्दांनी एकच गर्दी केल्याने मोठ्या रांगा लागल्या आहेत.
पाचोरा तालुक्यात श्रावणबाळ वृधापकाळ योजना (६,८१७), संजय गांधी निराधार योजना (५,६००), इंदिरा गांधी निराधार योजना (४,९६९), इंदिरा गांधी विधवा योजना (४६६) व इंदिरा गांधी अपंग योजना (२६) असे एकूण १७ हजार ८७८ लाभार्थी आहेत. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्र्थींना वर्षातूून एकदा नोव्हेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत हयातीचा दाखल कार्यालयात सादर करावा लागतो. दाखले सादर करताना ग्रामीण भागात सरपंच अथवा पोलीस पाटील, तर शहरी भागात रहिवासी असलेल्या प्रभागातील नगरसेवकाचा दाखल घेणे आवश्यक असतो. या दाखल्यासोबत आधार कार्डाची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स व खात्री करण्यासाठी पास बुकची मूळ प्रत आणणे आवश्यक असते. यापूर्वी लागार्थींचे खाते संबंधित गावाच्या पोष्ट कार्यालय व गावाजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेत होते. मात्र आता ते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यात आल्याने लाभाथींचे खाते आधारशी लिंक करून थेट खातेदाराचे नावावर पैसे ट्रान्स्फर करण्यासाठीची ही योजना आहे. यात विविध योजनांचे अनुदान ६०० रुपयांहून १ हजार रुपये तर इंदिरा गांधी विधवा योजनाचे ७०० हून एक अपत्य असलेल्या लाभार्थी साठी १ हजार १०० रुपये व दोन अपत्यासाठी १ हजार २०० रुपये अनुदान मिळणार असल्याने या लाभार्र्थींनी आपत्यांचे दाखले जोडावे, असे आवाहन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले आहे.