पारोळा येथे लसीकरणासाठी पहाटे पाचपासून रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:22 PM2021-05-06T12:22:30+5:302021-05-06T12:23:03+5:30
लसी २०० प्राप्त आणि ४५० ते ५०० नागरिक हजर होते.
रावसाहेब भोसले
पारोळा : येथील एन.ई.एस. हायस्कूलमध्ये नवीन लसीकरण केंद्र देण्यात आले. या केंद्रावर नागरिकांनी पहाटे पाचपासून रांगा लावल्या होत्या. पण केंद्रावर लसीकरणाची प्रत्यक्ष सुरुवात ही साडेदहाला झाली. त्यामुळे खूप गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. गेल्या पाच दिवसांपासून लसीकरण बंद होते. त्यामुळे नागरिकांनी लसी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. गुरुवारी २०० डोस प्राप्त झाले आणि सुमारे ४५० ते ५०० नागरिक लसीकरण केंद्रावर हजर होते.
लसीकरण केंद्रावर मोबाईलवर रजिस्ट्रेशन खूप संथ गतीने होत असल्याने लसीकरणाचा वेग कमी होता. यामुळे लोकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. मग याठिकाणी तुषार भावसार यांनी मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना करून दिली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, तहसीलदार अनिल गवांदे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन अडचणी समजून घेतल्या.
यावेळी लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी संगणक व मनुष्यबळाची कमतरता असल्याने लसीकरणाला खूप वेळ लागत असल्याचे दिसून आले.
दि. ६ रोजी कोव्हीशिल्डचे २०० डोस जिल्हा पातळीवरून प्राप्त झाले आहेत. ७ रोजी २०० डोस प्राप्त होतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी दिली.
लसीकरणासाठी डॉ. योगेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका राखी बडगुजर, कांबळे व राजू वानखेडे यांनी परिश्रम घेतले.