सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारी अर्ज दाखल करताना लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 02:49 PM2020-12-29T14:49:13+5:302020-12-29T14:50:29+5:30
सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले.
बोदवड : अर्ज दाखल करण्यास एक दिवसाचा अवधी बाकी असल्याने उमेदवारांची एकच झुंबड उडाली. परिणामी सर्व्हर डाऊन झाल्याने एकेका उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी ताटकळत थांबावे लागले.
तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आता केवळ २४ तासांची मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय तसेच ऑनलाइन सेंटरवर गर्दी उसळली होती. तसेच निवडणूक आयोगाच्या संकत स्थळावर अर्जाचा पाऊस पडल्याने सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांना नामांकन भरण्यासाठी चक्क रांगा लावाव्या लागल्या. त्यात भारत दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्याने इंटरनेट सुविधाही कोलमडली होती. त्यामुळे दुपारपर्यंत उमेदवार हातात अर्ज घेऊन रांगेत होते.
दरम्यान, काहींनी निवडणूक प्रभारी अधिकारी जितेंद्र कुवर यांची भेट घेतली. त्यांना वेळ वाढवून द्यावी अथवा ऑफलाइन अर्ज घेण्याचे सांगण्यात आले, परंतु आयोगाचे आपल्याकडे अद्याप असे कोणतेच निर्देश नसल्याने आपण तसे करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.