शिरसोलीत लसीकरणासाठी लागतात दुपारपर्यंत रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:45+5:302021-07-25T04:15:45+5:30
नियमित लस उपलब्ध करून देण्याची मागणी शिरसोली: येथे लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्या तरी दुपारपर्यंत ...
नियमित लस उपलब्ध करून देण्याची मागणी
शिरसोली: येथे लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामस्थांच्या रांगा लागत असल्या तरी दुपारपर्यंत थांबूनही लस मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून येथील केंद्रावर नियमित लस व लसीविषयी माहिती वेळोवेळी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
शिरसोली येथील लसीकरण केंद्रावर गेल्या तीन महिन्यांपासून ४५ प्लस व १८ प्लस व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला येथील लसीकरण केंद्रावर जनजागृतीअभावी लस घेण्यासाठी ग्रामस्थांमध्ये नाराजी असल्याने या केंद्रावर गर्दी नसायची. परंतु आता लसीविषयी पुरेशी जनजागृती झाल्याने लस घेण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत असले तरी येथील केंद्रावर नियमित लस उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना सकाळी ५ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत रांगा लावून ताटकळत उभे राहूनदेखील लस मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
अशीच गर्दी २४ रोजी सकाळी ५ वाजतापासून ११ वाजेपर्यंत येथील लसीकरण केंद्रावर केली; परंतु लस उपलब्ध नसल्याचे कळताच ग्रामस्थांचा हिरमोड झाला. या वेळी काहींनी संताप व्यक्त करून नियमित लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
----------------------------
येथील लसीकरण केंद्रावर कधी लस प्राप्त होईल हे अम्हालाही माहीत नसते. लस उपलब्ध होताच ती आम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचवितो. २३ रोजी ५० लस उपलब्ध झाल्या होत्या. त्या आम्ही त्याच दिवशी दिल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही येथे लस घेण्यासाठी गर्दी झाली होती. - अनिल महाजन, आरोग्य सेवक
-----------------------------
सकाळी ५ वाजतापासून ११ वाजेपर्यंत लस घेण्यासाठी रांगेत उभे असलेले ग्रामस्थ.