जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनपात रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:29 PM2018-07-11T13:29:08+5:302018-07-11T13:36:12+5:30
अर्जांचा पाऊस
जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी बुधवारी सकाळपासूनच मनपात प्रचंड गर्दी केली होती. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूक उमेवारांनी मनपात रांगा लावल्या होत्या. अर्जांचा अशरक्ष: पाऊस पडत होता.
भाजपा व शिवसेनी युती होणार...होणार म्हणून अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या सहा दिवसांपर्यंत अर्जच दाखल केले नाही. मंगळवारी एकाच दिवशी ७५ उमेदवारांनी १०६ अर्ज दाखल केले. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच उमेदवारांनी मनपात गर्दी केली. सकाळी ११ वाजेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. इच्छूक उमेदवार, त्यांचे समर्थक, चाहते, नगसेवक यांनी प्रचंड गर्दी केली होती.
गर्दी होऊ नये म्हणून मनपाच्या प्रवेशद्वारावरच उमेदवारांना अडविण्यात येत होते. उमेदवार व त्यांच्यासोबत दोन जणांनाच मनपात प्रवेश देण्यात येत होता. गोंधळ होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नेहरु चौकात बॅरिकेडस लावण्यात आले होते. महात्मा गांधी मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. वाहतूक रेल्वे स्टेशनकडून वळविण्यात आली होती.