‘गिरणा’च्या रब्बी आवर्तनाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 10:05 PM2020-01-07T22:05:12+5:302020-01-07T22:05:17+5:30
अत्यल्प प्रतिसाद : अपेक्षित पाणी मागणीअभावी कालवे कोरडेठाक, नियोजनाची गरज
संजय हिरे ।
खेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्जाची मुदत दोन वेळेस वाढवूनही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे अपेक्षित पाणी मागणी अर्जाअभावी ठरवलेल्या रब्बी हंगामाच्या वेळापत्रकानुसार गिरणा कालव्यांना आवर्तन तर सुटले नाहीच, परंतु शेतकऱ्यांची अशीच उदासीनता यापुढेही कायम राहिल्यास गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी आवर्तनाची गरज आहे की नाही? अशी चिंता व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पांझण, जामदा व दहिगाव या गिरणा कालवा लाभक्षेत्रातून फक्त ४ हजार ३४१ हेक्टर क्षेत्राची पाणी मागणी आजवर आली आहे. प्रत्यक्षात या कालव्यांचे लाभक्षेत्र ५० हजार हेक्टरवर आहे. याशिवाय एक लाख हेक्टरवर क्षेत्राला अप्रत्यक्षपणे गिरणा कालव्यांना आवर्तन सोडल्यावर लाभ होत असूनही शेतकरी मागणी अर्ज भरत नाही, अशी खंत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
यंदा गिरणा धरणात शंभर टक्के जलसाठा झाल्याने पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी १५ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारी या दरम्यान कालव्यांना आवर्तन सोडण्याचे जाहीर केले. सुरवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत व त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवूनही अपेक्षित पाणी मागणी झाली नाही. ही चिंताजनत बाब आहे.
यास अनेक कारणे असली तरी डिसेंबरपर्यंत लाबंलेला खरीप हंगाम, अतिवृष्टीमुळे विहिरींना, नदी-नाल्यांना असलेले मुबलक पाणी व गिरणा धरण भरुनही उन्हाळी हंगाम नजरेआड करीत फक्त रब्बी हंगाम डोळ्यासमोर ठेवत पाटबंधारे विभागाने जाहीर केलेला कार्यक्रम व कर्मचाºयांना चिरीमिरी देत केली जाणारी आवर्तनातील पाण्याची चोरी, नादुरुस्त पाटचाºया हे कमी पाणी मागणी अर्ज आल्यामागची प्रमुख कारणे आहेत.
आता रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांचा पेरणीचा कालावधी जवळजवळ आटोपला आहे.
आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांतच रब्बीची पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते.
आजच्या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष
गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी अपेक्षित पाणी मागणी अर्ज न आल्याने ठरलेल्या नियोजनानुसार रब्बीसाठी कालव्यांना आवर्तन सोडण्याचा धोका पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी पत्करला नाही. यामुळे हा निर्णय आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठ जानेवारी रोजी कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र आता रब्बी हंगामाचा कालावधी हुकल्याने रब्बी-उन्हाळी अशा संमिश्र हंगामाचे नियोजन होण्याची आवश्यकता जाणकार व्यक्त करीत आहेत. लेट रब्बीसाठी अर्थात मार्चअखेरपर्यंत तिसरे आवर्तन सुटेल, यास पाटबंधारे विभागाकडून दुजोरा मिळत आहे.
रब्बी-उन्हाळी संमिश्र हंगामासाठी नियोजन हवे
आता पाटबंधारे विभागाला गिरणा कालव्यांना आवर्तन सोडावयाचे झाल्यास रब्बी-उन्हाळी अशा संमिश्र हंगामासाठी आवर्तनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. उशिरा मार्चपर्यंत किंवा १५ एप्रिलपर्यंत सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन झाल्यासच शेतकºयांकडून पाण्याची मागणी वाढू शकते. उन्हाळी बाजरी, सूर्यफुल, भुईमुग व ज्वारी आदी पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे.