जमिनीतील ओलाव्यामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 11:11 PM2019-11-24T23:11:05+5:302019-11-24T23:11:34+5:30
जोरदार पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जळगाव : यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा परिणाम आता रब्बीच्या हंगामावर देखील होत आहे. रब्बीसाठी शेत तयार करताना जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
यंदाच्या विक्रमी पाऊस व त्यानंतर झालेल्या अवकाळीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापसासह, मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पावसामुळे शेत देखील वाहून निघाले होते. दरम्यान, आता रब्बीसाठी शेत तयार करताना जमिनीतील ओलाव्यामुळे वखरणी, रोटर, नांगरणी देखील करता येत नाही. त्यामुळे जळगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये रब्बीची पेरणी देखील झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी उडीद, मूगाची लागवड केली होती. अशा शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली आहे. जिल्हा कृषी विभागाकडून यंदा रब्बीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्पादनात जरी वाढ होणार असली तरी रब्बीचा हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात येतो तो हंगाम मार्च च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लांबण्याचीही शक्यता आहे. तसेच रब्बीसाठी जोरदार थंडीचीही प्रतीक्षा शेतकºयांना आहे.