रेल्वे व बससेवेला अडथळ्याची शर्यत, विमानसेवेला अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:15 AM2021-07-26T04:15:59+5:302021-07-26T04:15:59+5:30
जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा ...
जळगाव : पावसामुळे मुंबई पाठोपाठ पश्चिम मार्गावरही रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्यामुळे, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांनी विमानसेवेचा पर्याय स्वीकारला आहे. रविवारी जळगावहून विमानाने अहमदाबादला ३४ प्रवासी गेले तर शनिवारी ३५ प्रवासी गेले होते. एरव्ही अहमदाबाद मार्गावर बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी मिळत असताना, पावसामुळे मात्र रेल्वे गाड्यांचा खोळंबा होत असल्याने प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी विमानसेवेकडे वळत आहेत.
विमानाच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी महिनाभरापासून बंद असलेली विमानसेवा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून दर बुधवारी, शनिवारी व रविवारी सुरू आहे. विशेष म्हणजे विमानतळावर गेल्या वर्षापासून नाईट लॅंडिंगची सुविधा झाल्यामुळे, ही सेवा नियमित सुरू आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या निम्म्याने कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबई मार्गावर कधी १५ तर कधी २० प्रवासी मिळत असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले. अहमदाबादपेक्षा मुंबई मार्गावर नेहमीच प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतांना, पावसामुळे मात्र पहिल्यादांच मुंबई मार्गावरची प्रवासी संख्या घटली असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
अहमदाबाद मार्गावरची प्रवासी संख्या वाढली :
पावसामुळे एकीकडे मुंबईकडे जाणाऱ्या विमानाच्या प्रवासी संख्येत दुपटीने घट झाली असतांना, दुसरीकडे अहमदाबाद मार्गावरही पावसामुळे अनेक रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अनेक प्रवासी विमानाने अहमदाबादकडे जाण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या पावसामुळे या गाड्यांना अधिकच विलंब होत असल्यामुळे, प्रवासी अवघ्या एका तासांत अहमदाबादला पोहोचत असल्यामुळे, प्रवाशांचा कल विमानसेवेकडे आहे.