रागा- रागा त्याज्य करूया़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 04:42 PM2019-06-08T16:42:19+5:302019-06-08T16:43:19+5:30

राग आला नाही, असा माणूस सापडणं तसं दुर्मीळच. प्रत्येकाला राग येत असतो. फरक फक्त व्यक्तीची राग व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हा प्रत्येकाचा स्वभावही असतो. राग या लेखमालेतील चौथा आणि शेवटचा भाग.

Raga-raga let us do it | रागा- रागा त्याज्य करूया़़़

रागा- रागा त्याज्य करूया़़़

Next

१४. आक्रस्ताळेपणा- हा प्रकार होत्याचं नव्हतं करून ठेवतो. डोक्यात राख घालून क्षुल्लक गोष्टी मोठ्या बनवतात़ समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेता, कारणमीमांसा न करता तोंडाचा पट्टा सुरू ठेवतात. साधं, सरळ, सहज वागणं नाही जमत यांना. स्वत: कधी चुकतच नाहीत, असा अहंकार. समोरच्याकडं नकारात्मक दृष्टीनं पाहून राग व्यक्त करतात. स्वत:चं डोकं आपटतील़ आपलेच केस ओढतील किंवा समोरच्यावर हात उगारतील. भांडी फेकतील. कपबशा फोडतील़ तोडफोडीतून स्वत:चं नुकसान करतील आणि आजूबाजूच्यांचंही करतील़
१५. रूद्रावतार- काही लोक हेकेखोर वृत्तीचे. स्वत:ला ग्रेट समजणारे. इगोइस्ट असतात. संपर्कात येणाऱ्यांना मग ते नातेवाईक असोत, मित्र असोत साऱ्यांना तुच्छ लेखतात. स्वत:ची प्रत्येक कृती त्यांना योग्य वाटते, मनाविरूद्ध घटना घडल्यास ते समोरच्यास जबाबदार धरतात आणि शिव्या-शाप, अर्वाच्च शब्द बोलून आक्राळविक्राळपणे अपमानास्पद वागणूक देतात. अशी भांडणं करतात की आकाशपाताळ एक करतील की काय, अशी भीती वाटते. अहंपणाने वागून नाती तोडतात़
१६. हिंसक- हा राग सर्वोच्च पातळीचा. एखाद्या व्यक्तीला आला तर ती हिंसक बनते. समोरच्यास मारायला धावते. मारते. कधी कधी दुष्कृत्य हातून घडते असे की़, एखाद्याचा बळी घेऊ शकते. समाजात अशा काही घटना घडतात की, त्यांना हिंसक वळण दिलं जातं. त्यात निष्पाप लोक मारले जातात़ जातीय दंगली, जाळपोळ, बॉम्बस्फोट, अतिरेकी-अविवेकी कृत्ये करतात. ही कृत्यं हिंसक राग प्रकृतीतून घडतात. कुटुंबं बरबाद होतात. वाड्या, गावं उद्ध्वस्त होतात. हिंसाचारातून साध्य काहीच होत नाही. होते ती फक्त हानी-व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची़, देशाची.
१७. संताप चिड- हा प्रकार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो. जेव्हा मनाविरूद्ध घटना घडतात तेव्हा रागाचा पारा चढतो. हा प्रकार अन्य प्रकारापेक्षा वेगळा आहे. जेव्हा आपल्यावर अन्याय होतोय हे दिसतं तेव्हा, अपेक्षित उमेदवार निवडणूक हरतो तेव्हा, चूक नसताना फक्त खुर्चीमुळं, अधिकारामुळं, ती व्यक्ती अपमान करते तेव्हा़, अंधश्रद्धेचा बळी पाहून, टोमणे मारणे, अपशब्द बोलणे, अनिष्ट वर्तन करणे या प्रकारचा संताप होतो. आपण घाईत असतो, इप्सित स्थळी वेळेत पोहचायचं असतं आणि अशावेळी रस्त्यावर गर्दी, ट्रॅफिक जाम, पेट्रोल संपणं यावेळी संताप होतोच. मग तो शब्दातून, कृतीतून व्यक्त होतो. व्यवस्था, यंत्रणा, साºयाचीच चिड येते़ प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, धाडस, कर्तव्यदक्षता, कार्यतत्परता या गुणांची कदर न होता वशिलेबाजीमुळंही संताप-चिड वाढते़
१८. आळवा वरचा- हा प्रकार थोडा वेगळा हळूवार शांती निष्कपट, सामंजस्य, सात्विक, सहनशील, सुज्ञ लोकांमध्ये तो आढळतो़ म्हणजे असं नाही की ते रागावतच नाहीत. तेही रागावतात पण तो त्यांना व्यक्त करता येत नाही़ त्याचं गणित असं असतं़ आला राग १ ते १० नाही तर १०० पर्यंत अंक मनात मोजायचे किंवा मग विचार, मुद्दा नाही पटत तर मग वाद नको़ पुढचं अघटितही नको़़ तिथून निघून जाणं पसंत करतात़ कधी कधी रागावतातही, पण तो राग क्षणिक असतो़ जसं आळवावरच्या पानावर पाणी थांबत नाही. चटकन घरगळून जातं, अगदी तसंच ते रागावल्याचा आव आणतात. पण नाही जमत त्यांना खुन्नस धरणं, आदळ आपट करणं, आकांडतांडव करणं इ़़़ असे लोक आपल्या सानिध्यात असतील हा सहनशीलपणा आपण आपल्यात थोडासा बाणवला तर किती छान होईल. नाही का? बाकीचे १७ राग जातील उडत आणि पर्यायाने साºया जगात आनंदाचे संगीत राग आळवले जातील़
वाचक हो, हे सारे राग प्रकार आपण अनुभवत असतो़. आपल्या ठायीही ते भिनलेले असतात. राग आपली मानसिक, शारीरिक स्थिती बिघडवतो़ मानसिक स्थिती स्वत:बरोबर जवळच्या लोकांचं नुकसान करते़ रागाच्या भरात वाईट कृती घडते़ अविचारी राग़ आत्मघातकी ठरतो या वृत्तीने संपूर्ण कुटुंब होरपळतं. रागामुळं माणसं दुरावतात़ राग आपल्याला वाईट कृती करायला लावतो. अपशब्द, शिव्या रागातूनच बाहेर पडतात आणि नात्यांना तडा जातो़ मानसिक संतुलन बिघडतं. प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहिलं जातं़. तर्कवितर्क केले जातात़ शारीरिक स्थिती बिघडते़ अनेक आजार मागे लागतात. बी़पी़, डायबेटिस, चक्कर येणे, डोकं दुखणं इ़इ़़़़़़
ठीक आहे राग येणं ही प्रवृत्ती आहे़ पण मनाला संयमित ठेवून त्या रागावर विजय मिळवणं ही सत्कृती होऊ शकते़ एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर वाद घालण्यापेक्षा तिथून निघून जाणं़ शब्दांनी शब्द वाढविण्यापेक्षा सरळ दुर्लक्ष करणे़, समोरच्या व्यक्तीचं आचरण अयोग्य वाटलं तर राग, भांडणापेक्षा नि:शब्द होणं केव्हाही चांगलं. चला तर मग या रागावर ताबा मिळविण्यासाठी आपणच आपल्याला ओळखून बदलूया़
रागे रागे,
विखुरती धागे़़़
तुटती नाती़़़़
शत्रू वाढती़़़़
मैत्र दुरावती़़़़
स्रेही दुखावती़़़़
संयम राखती़़़़
ना क्रोधे धरती़़
करार सामंजस्या प्रती़़
देश-विदेशही मैत्री साधती़़़़़
धागा धागा अखंड गुंफूया़़
रागा - रागा त्याज्य करूया़़़
(समाप्त)
-प्रिया सफळे, जळगाव

Web Title: Raga-raga let us do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.