रघुनायका सारीखा स्वामी शिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:57 PM2020-02-03T12:57:18+5:302020-02-03T12:57:36+5:30
समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून ...
समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधातून मनाला सुरेख मार्गदर्शन केले आहे. सगळे खेळ मनाचेच असतात. प्रपंचातही आपण शांती तीन गोष्टींमुळे गमावून बसतो. भूतस्मरण, भविष्यचिंतन अन् या दोन्हीमुळे वर्तमान विस्मरण. आम्हास वर्तमानात जगताच येत नाही.
खरंतर कालचा दिवस हातातून निघून गेला आहे. उद्याचा दिवस आपल्या हातात नाहीे. फक्त आणि फक्त आजचा दिवस आपल्या हाती असतो, तो आम्हास आनंदात घालवायचा आहे. परंतु आम्ही नको त्या भीतीने ग्रासलेलो असतो आणि आनंद गमावून बसतो. नसलेल्या भितीचे दोर आम्ही स्वत:च्या गळ्याभोवती बांधून घेतो ते नसलेले दोर, आम्हास सोडायचे आहे.
.राज्यस्थानातल्या वाळवंटात काही लोकांचा काफिला, आपल्या उंटासह रात्री मुक्कामाला थांबतो. एका उंटाला बांधण्यासाठी ठोकायला खुंटीही नसते अन् दोरही नसतो. उंटाला बांधले नाही तर तो रात्रीतून कुठेतरी निघून जाईल, या काळजीत सगळे असतात. एक वृध्द व अनुभवी व्यक्ती सांगते की, सोपा उपाय आहे. त्या उंटासाठी नसलेली खुंटी ठोका अन् नसलेला दोर त्याच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे करा. सग्ळ्यांना आश्चर्य वाटते. त्या व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे, नसलेला खुंटा जमिनीत ठोकल्यासारखे केले जाते अन् नसलेला दोर त्या उंटाच्या गळ्याभोवती बांधल्यासारखे केले जाते.
दुसऱ्या दिवशी बाकी सगळे उंट पुढच्या प्रवासासाठी जाण्यास निघतात. परंतु हा उंट काही जागचा उठत नाही. यावर अनुभवी वृध्द व्यक्ती सांगते की, या उंटासाठी जी नसलेली खुंटी ठोकलेली आहे आणि नसलेला दोर जो त्याच्या गळ्याभोवती बांधला आहे, ती खुंटी आणि दोर सोडल्यासारखे करा. त्याप्रमाणे केले जाते. उंट ताबडतोब जागीचा उठतो आणि पुढचा प्रवास सुरु होतो.
आम्हीसुध्दा भीतीचे नसलेले दोर आमच्याभोवती बांधून घेतले आहेत आणि त्यामुळे आपण शांती गमावून बसलो आहोत. आम्हालासुध्दा भीती, चिंता, काळजीचा नसलेला खुंटा आणि गळ्याभोवती बांधलेला दोर काढायचा आहे. तरच आनंदात जगता येईल. त्यासाठी सद्गुरुनाथांना शरण जायला हवे. अनिती, अधर्माने न वागता, गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करायला हवे. तरच नसलेल्या भीतीचे दोर गळ्याभोवतीचे सोडले जातील.
- राया महाराज उपासनी, निजामपूरकर.