प्रवाशाला त्रास झाल्याने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:27 PM2018-11-02T15:27:51+5:302018-11-02T15:29:53+5:30
रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी जळगाव जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जळगाव : रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी जळगाव जिल्हा ग्राहक मंचाने रेल्वे प्रशासनाला ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. राजेंद्र साबळे असे तक्रारदार प्रवाशांचे नाव असून, साबळे यांना झालेल्या नुकसान भरपाईपोटी दंडाची रक्कम त्यांना एका महिन्याच्या आत देण्याचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार साबळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
साबळे म्हणाले, २२ एप्रिल २०१५ रोजी पुणे येथे वैद्यकीय उपचारासाठी ते पत्नीसह गेले होते. परतीच्या प्रवासासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसचे वातानुकूलित डब्याचे जेजुरी ते जळगाव असे दोन तिकीट घेतले. मात्र, त्यावेळी दोघांचे तिकीट प्रतीक्षा यादीत होते. २७ एप्रिल रोजी दोन तिकीटांपैकी एक तिकीट बी-२ या डब्यामध्ये ६४ नंबरच्या जागेवर निश्चित झाले असल्याचे समजले तर दुसरे तिकीट बी-१ या डब्यामध्ये ६३ नंबरच्या जागेवर असल्याचे आढळून आले. त्यानुसार साबळे हे पत्नीसह (गाडी क्र ११०३९) या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये रात्री ११ च्या सुमारास बी-२ या डब्यात चढले. मात्र, या डब्यातील आरक्षित असलेली ६४ नंबरची जागा आढळून आली नाही. यावर तिकीट निरीक्षकाकडे तक्रार केल्यावर त्यांनी, साबळेंकडे दुर्लक्ष केले. परंतु, साबळे यांनी जागेसंदर्भात पुन्हा तक्रार केल्याने, तिकीट निरीक्षकाने रात्री २.३० वाजता साबळे व त्यांच्या पत्नीलाही दुसऱ्या जागेवर बसण्याची व्यवस्था करून दिली. तिकीट आरक्षित असताना, प्रवासात झालेल्या त्रासाबद्दल साबळे यांनी भुसावळ येथे डीआरएम कार्यालयाकडे तक्रार केली. डीआरएम कार्यालयाने दोन महिन्यांनी साबळे यांना ही तक्रार, पुणे रेल्वे प्रशासनाशी संबंधित असल्याचे सांगितले. साबळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गंत २७ एप्रिल रोजी बी-२ या बोगीतील आरक्षित तिकिटांच्या जागेची माहिती मागविली असता, या बोगीमध्ये ६२ जागांचेच आरक्षण असल्याचे समोर आले. यावर साबळे यांनी ग्राहक मंचात रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली होती. ग्राहक मंचाने साबळे यांनी मांडलेल्या सबळ पुराव्यामुळे, रेल्वेला दोषी ठरवून, ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा वि. वि. दाणी व ग्राहक तक्रार निवारण मंचच्या सदस्या पूनम. एन. मलिक यांनी १६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निकालात वाणिज्य प्रबंधक पुणे यांना साबळे यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी ३५ हजार रुपये दंड ठोठावून ही रक्कम साबळे यांना महिनाभरात देण्याचे आदेश दिले आहेत. महिनाभरात ही रक्कम न दिल्यास त्यावर ९ टक्केदराने व्याज देण्याचे आदेश दिले असल्याचे साबळे यांनी सांगितले.