रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:53+5:302021-03-17T04:16:53+5:30
जळगाव : एमपीएससीची व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच २१ मार्च रोजी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे ...
जळगाव : एमपीएससीची व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच २१ मार्च रोजी असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. परिणामी, यामुळे एका परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या वर्ग १ व २ च्या पदांसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र, या परीक्षेच्या दोन दिवस आधीच राज्य शासनाने कोरोनाचे कारण देत ही परीक्षा रद्द केली अन् चौथ्यांदा परीक्षा रद्द केली, म्हणून विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली व त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. परिणामी, राज्य शासनाने लागलीच २१ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता एमपीएससी व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी आहे, त्यामुळे एका परीक्षेपासून विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. राज्य शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून जावे लागत असल्याचा, आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.
३२ हजार जागांसाठी रेल्वेची परीक्षा
रेल्वेची ३२ हजार २०८ जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. आधीच ही परीक्षा जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. मात्र, एका परीक्षेला संपूर्ण दिवस जात असल्यामुळे त्याच दिवशी दुसऱ्या परीक्षेला उपस्थिती देणे शक्य होत नाही. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा द्यावी की रेल्वेची, हा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.
केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना केंद्रांवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी जिल्ह्याबाहेर परीक्षा केंद्राची निवड केली असल्यामुळे, एक ते दोन दिवस आधीच केंद्र असलेले शहर गाठणार आहेत. मात्र, परीक्षा वारंवार रद्द होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सरकारने एमपीएससीची परीक्षा वेळेवर घेतली असती, तर विद्यार्थ्यांवर एका परीक्षेपासून मुकण्याची वेळ आली नसती. वर्षानुवर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. कुणीही एकाच परीक्षेवर अवलंबून राहत नाही, त्यामुळे विविध परीक्षांचा विद्यार्थी अभ्यास करतात. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे एका परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. सरकार राजकारणात व्यस्त असून, त्यांनी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण वाढत चाललाय.
- कुणाल अत्तरदे
परीक्षा दोन दिवसांवर असताना एमपीएससीची परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्यानंतर मग पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर केली. आता तर रेल्वेची व एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आहे. कोणता पेपर द्यायचा, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडणार आहे. ढिसाळ नियोजनामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोकरीवर याचा परिणाम होत आहे.
- अश्विनी कांबळे
एकाच परीक्षेवर कुणीही अवलंबून राहत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास विद्यार्थी करतात. जर एकाच दिवशी दोन पेपर असतील, तर विद्यार्थ्यांना दोनपैकी एका परीक्षेपासून मुकावे लागेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. त्यामुळे वांरवार परीक्षा रद्द होणे, एकाच दिवशी परीक्षा येणे यामुळे आर्थिक भुर्दंड विद्यार्थ्याला सहन करावा लागतो.
- आशिष सोनार