रेल्वे गेट बंद अन् बोगदाही नाही, विद्यार्थ्यांचे हालच हाल..!
By अमित महाबळ | Published: September 26, 2023 06:54 PM2023-09-26T18:54:19+5:302023-09-26T18:54:29+5:30
रस्त्याअभावी एसटी बसदेखील दापोरा गावात येत नाहीत.
जळगाव : मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गावरील शिरसोली रेल्वे गेट हे भुयारी बोगदा बनविण्यासाठी गेल्या वर्षापासून बंद करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. शिवाय पावसाळ्यात पर्यायी मार्गावर पाणी साचत आहे. यामुळे दापोरा, धानोरा व शिरसोली परिसरातील शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रस्त्याअभावी एसटी बसदेखील दापोरा गावात येत नाहीत.
रेल्वे प्रशासन भुयारी बोगदा बांधून शिरसोली गेट कायमस्वरूपी बंद करणार आहे. बोगद्याच्या कामासाठी म्हणून दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी, गेट बंद करण्यात आले. मात्र, कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे दापोरा ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. रेल्वेने उपलब्ध करून दिलेला पर्यायी रस्ता पावसाळ्यात उपयोगाचा नाही. तेथे पाणी साचते. दापोरा व शिरसोली येथील शेतकऱ्यांची शेती दोन्ही बाजूला असल्याने शेतात कसे जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. दापोरा गावातील २०० विद्यार्थी हे शिक्षणासाठी जळगाव व शिरसोली येथील शाळेत दररोज ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गावात येणारी बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
खासदारांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
भुयारी बोगद्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत शिरसोली रेल्वे गेट सुरू ठेवण्याची सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला केली होती. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने भुयारी बोगद्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शिरसोली रेल्वे गेट सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.