कोरोना काळात रेल्वे प्रवास ...नको रे बाबा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:37+5:302021-05-25T04:18:37+5:30
पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील ...
पूर्वी रेल्वे स्थानकावर एक वेगळी लगबग दिसत होती. मात्र, कोरोना काळात रेल्वे गाड्यांची संख्या कमी झाली व स्थानकावरील प्रवाशांचा राबताही अदृश्य झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असताना अचानक दुसरी जीवघेणी लाट आली व यातच अनेकांना आपले जीव गमवावे लागले. याचा सरळ परिणाम रेल्वेवरही झाल्याचे दिसून आले, अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनास रद्द कराव्या लागल्या. तसेच रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या नावाखाली काही गाड्या सुरू केल्या व त्याची भाडे दरवाढ ३५ टक्क्यांनी वाढवली. त्यावरूनही नाराजी आहे.
प्रवास नको रे बाबा ..
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त बिकट परिस्थिती दिसून आली. राज्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आले. याचा परिणामही प्रवाशांची घटती संख्या यात दिसून आला. यातच शासनाने कडक निर्बंध लादले व पहिल्यापेक्षा कितीतरी भयंकरपटीने कोरोनाची दुसरी लाट लोकांनी अनुभवली. अति महत्त्वाच्या कामाशिवाय कोणीही इतर जिल्ह्यासह राज्यामध्ये नागरिकांनी जाणे टाळले, कोरोना काळात प्रवास नको रे बाबा म्हणत अनेकांनी झालेली रेल्वे तिकिटाची बुकिंग रद्द केली. याचा परिणाम रेल्वेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.
असे जाणवताहेत परिणाम
११ ते २० एप्रिल या दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालयातील खिडकीवरून ८८० तिकीटांतून २ हजार प्रवाशांनी आपले प्रवास रद्द केले. यातून रेल्वेला ६ लाख ५० हजारांचा परतावा करावा लागला. २१ ते ३० एप्रिल दरम्यान ८८५ तिकीटांतून १ हजार ८८६ प्रवाशांनी प्रवास रद्द केले. रेल्वेला ५ लाख ६३ हजारांचा परतावा करावा लागला. १ ते १० मे दरम्यान ५१० तिकीटांतून १ हजार ३१० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, यातून रेल्वेला ६ लाख ४ हजारांचा परतावा करावा लागला. ११ ते २० या दरम्यान ६५० तिकीटातून २ हजार १५० प्रवाशांनी प्रवास रद्द केले, रेल्वे प्रशासनाला ६ लाख ४७ हजार परतावा करावा लागला.
——-
ऑनलाईनवरून सुद्धा हीच स्थिती
तिकीट काऊंटर या खिडकीवरून जवळपास पन्नास दिवसांमध्ये २५ लाखांचा रेल्वे प्रशासनाला परतावा करावा लागला. हीच स्थिती ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यामुळे, त्याचाही परतावा रेल्वेला वेगळा करावा लागला. याशिवाय विविध एजंटकडूनही काढण्यात आलेले तिकिटाचे रद्दीकरण करण्यात आलेले आहे.
——
सेवाग्राम एक्सप्रेस रद्द
मुंबई- नागपूर ०२१६९ अप व डाऊन सेवाग्राम एक्सप्रेसलाही रेल्वे प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाडीमुळे विदर्भासह खानदेशातील नागरिक मुंबईशी जोडले जात होते. तूर्तास ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे.