भुसावळात रेल्वे पादचारी पुलाचे काम कासव गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 06:09 PM2020-04-24T18:09:47+5:302020-04-24T18:10:52+5:30
ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराकडील स्वयंचलित जिल्ह्याला लागून असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पाडण्यात आला होता. तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एक वर्ष उलटले तरीही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊनमध्ये पुलाचे कार्य पूर्ण करण्याची संधी आहे.
मुंबई येथे रेल्वेचा पादचारी पूल पडल्यानंतर मोठा अपघात झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे एप्रिल २०१९ ला रेल्वे स्थानकावरील मुख्य प्रवेशद्वाराकडील स्वयंचलित जिन्याला लागून असलेले ब्रिटिशकालीन पादचारी पूल फलाट १-८ पर्यंत जोडले गेले होते. जीर्ण पुलाचा धोका नको म्हणून रेल्वे प्रशासनाने पूल जमीनदोस्त केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात पुलाची पुनर्बांधणी करण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरीही पुलाचे काम थंडबस्त्यात आहे.
स्वयंचलित जिने पुलाअभावी ठरताय शोपीस
रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पुलावर जाण्याकरिता जिन्याला लागून स्वयंचलित जिना तयार करण्यात आला होता व यावरून थेट जुन्या पुलावरून फलाट १ ते ८ पर्यंत जाण्यासाठी सोयीचे होते. मात्र जुना पूल पडल्यामुळे स्वयंचलित जिने फक्त शोपीस ठरत आहेत.
लॉकडाऊनमुळे पुलाचे कार्य करण्याची संधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून प्रवासी रेल्वे बंद आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला कोणतीही तांत्रिक अडचण नाही. या काळात रेल्वेला तांत्रिक अडचणी नाही. यामुळे लवकरात लवकर पुलाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
रॅम्पवरून मारावा लागतो फेरा
जुना पादचारी पूल जमीनदोस्त झाल्यामुळे व स्वयंचलित जिनेही बंद असल्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराकडून फलाटांवर जायचे असल्यास प्रवाशांना मोठा फेरा मारून जावे लागते. जुन्या पुलावरून अवघ्या काही मिनिटातच सरळ मुख्य प्रवेशद्वाराकडून तर फलाट ८ पर्यंत जाण्याची सोय होती.