रेल्वे सुरक्षा बलाची तिकीट दलालांविरोधात मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:39 PM2020-12-08T16:39:17+5:302020-12-08T16:41:30+5:30
रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेस तीव्र केले आहे.
भुसावळ : रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची दलाली रोखण्यासाठी व प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या विरुद्धच्या मोहिमेस तीव्र केले आहे. लॉकडाऊन कालावधीत आणि त्यानंतर अनलॉक कालावधीत रेल्वेने विशेष गाड्या वर्गीकृत पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली आहे. या विशेष गाड्यांमध्ये अनेक वैयक्तिक ओळखपत्र (आयडी) वापरून आरक्षण करणे आणि आरक्षित जागा बळकावण्यासाठी ई-तिकिटांच्या तक्रारी प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ टीमने तातडीने कारवाई केली आणि सायबर सेलकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे व इतर सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकण्यास सुरवात केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागात हे छापे टाकण्यात आले. त्यातील बहुतांश खासगी प्रवासी एजन्सींच्या आवारात होते. नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये तिकीट दलालीचे १७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त, या कोविड साथीच्या आजाराच्या काळात मध्य रेल्वेची आरपीएफ टीम रेल्वेच्या सामाजिक बांधीलकीच्या प्रत्येक बाबीत अग्रभागी कोरोना योद्धा म्हणून उभे राहिली आहे.
मुखपट्टी परिधान करणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासारख्या कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे नियमन आणि मार्गदर्शन करण्यात आरपीएफची टीम सक्रियपणे कार्यरत आहे.
अल्पवयीन मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयाशी पुन्हा एकत्र आणणे, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यात मदत करणे; वेळेवर वैद्यकीय सहाय्य करून आणि अर्भकांसाठी दुधाची व्यवस्था करून तसेच गर्भवती महिलांना ट्रेनमध्ये चढण्यास मदत करणे; अमली पदार्थ, मद्य वगैरे जप्त करून गुन्हेगारांवर नजर ठेवणे; गाड्यांमध्ये राहिलेल्या मौल्यवान/वस्तू असलेल्या पिशव्या/बॅग्स शोधून काढणे आणि योग्य पडताळणीनंतर त्या मालकांकडे परत करणे. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना खाली पडलेल्या प्रवाशांचे प्राण वाचविण्याचे कामही आरपीएफ टीमने केले आहे.
महिला प्रवाशांना विशेषतः एकट्या प्रवास करताना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरपीएफ चमूने नुकतीच ‘मेरी सहेली’ उपक्रमही सुरू केला आहे. या ऑपरेशन अंतर्गत, आरपीएफचे पथक दैनिक व साप्ताहिक विशेष गाड्यांसह सरासरी २५ गाड्यांमधून एस्कॉर्टिंग करतात.