जळगावातील शिवाजीनगर उड्डाण पुलासाठी ‘रेल्वे’ तयार, मात्र मनापाचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:51 PM2018-03-06T12:51:30+5:302018-03-06T12:51:30+5:30
होळीनंतरचाही मुहूर्त हुकला
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ - १०० वर्षे जुना व जीर्ण झालेला शिवाजीनगर उड्डाणपूल पाडून नवीन पूल उभारणीच्या कामास विरोध होवू लागल्याने कामाच्या शुभारंभाचा होळीचा मुहूर्तदेखील हुकला आहे. नवीन पूल उभारणीसाठी रेल्वे प्रशासन तयार असले तरी आता महानगरपालिकेकडूनच जुना पूल पाडण्यास नकार दिला जात असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी मंगळवार, ६ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहे.
शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने यापूर्वीच या पुलावरील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. आता ही गैरसोय दूर व्हावी यासाठी त्या जागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन कंत्राटही देण्यात आले व होळीनंतर जुना पूल तोडण्यास सुरुवात होणार होती.
मात्र हा पूल पाडल्यास असलेल्या पर्यायी मार्गावरून नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे कारण पुढे करीत आता पूल तोडण्यास मनपाच नकार देत असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थानिक राजकारण यास अडथळा ठरू पाहत असल्याचेही अधिकारी दबक्या आवाजात सांगत आहे. जुना पूल पाडल्याशिवाय नवीन पूल कसा उभारला जाणार असा प्रश्न आता रेल्वे पुढे उभा राहिला आहे.
पहिल्यापासूनच अडथळ््यांची शर्यत
शिवाजीनगर उड्डाणपूल जीर्ण होऊन धोकादायक झाला असला तरी त्याबाबत सुरुवातीपासून अडचणी येत असल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामास सुरुवात होत नव्हती, मात्र यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला व प्रक्रियेस सुुरुवात केली. तरीदेखील आता त्यात अडथळे आणले जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.