भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:55 PM2019-05-08T16:55:33+5:302019-05-08T16:58:10+5:30
भुसावळ येथील मोहीत नगर भागातील रहिवासी व रेल्वेच्या साहित्य पुरवठा विभागात कार्यरत लिपीक गौतम आनंदा शिंदे (वय ३७) यांनी आत्महत्या केली.
भुसावळ, जि.जळगाव : येथील मोहीत नगर भागातील रहिवासी व रेल्वेच्या साहित्य पुरवठा विभागात कार्यरत लिपीक गौतम आनंदा शिंदे (वय ३७) यांनी आत्महत्या केली. ८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
सन २००४ पासून रेल्वे सुरक्षा बलामध्ये खानावळ विभागात कार्यरत व काही कारणात्सव गेल्या वर्षापासून रेल्वे विभागात स्टोअरमध्ये लिपीक पदावर कार्यरत असलेले गौतम आनंदा शिंदे हे त्यांच्या राहत्या घरी ७ मे रोजी पहिल्या मजल्यावर झोपले होते. बुधवारी सकाळी गौतम शिंदे यांची आई त्यांना उठविण्याकरिता वरच्या मजल्यावर गेल्या असता गौतमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गौतमचा मृतदेह बघताच आईसह परिवाराने हंबरडा फोडला. यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले.
दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळी बारीक दोरी व लोखंडी शिडी आढळून आली. पोलीस पंचनामा करुन जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले.
गौतम यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, दोन भाऊ , तीन बहिणी असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे .
दरम्यान, ६ रोजी रेल्वे पोलीस कर्मचारी मिलिंद देशमुख यांचा सहकुटुंब तामिळनाडू येथे अपघात झाला. यात देशमुखांसह कुटुंबीयांचे सहा सदस्य ठार झाले होते. लागोपाठच्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी घटनांमुळे रेल्वे कर्मचाºयांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.