रेल्वे भुयारी मार्गाला सापडला मुहूर्त; शेतकऱ्यांचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:12 PM2023-04-03T19:12:22+5:302023-04-03T19:13:22+5:30
भादली रेल्वे गेटजवळ कामास सुरुवात : सात गर्डर टाकले, १५ एप्रिलपर्यंत होणार काम पूर्ण
जळगाव : गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. या मुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या मार्गासाठी सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे विभागाने सन २०१७मध्ये भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी ‘लोकमत’ने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांविषयीचा पूर्ण लेखाजोखा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. सोबतच नशिराबाद येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठविला होता. रेल्वे फाटक बंद न करता आहे त्याच ठिकाणाहून भुयारी मार्ग करण्यास रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर नशिराबादकरांना दिलासा मिळाला. मात्र अनेक वर्षे उलटूनही कामाला सुरुवात होत नव्हती. यामुळे नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना लांबच्या मार्गाने शेतात ये-जा करावी लागत आहे. या विषयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह गावातील अन्य लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांची भेट घेऊन भादली रेल्वे गेट फाटकाच्या समस्येबाबत व्यथा कथन केली. खासदार पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मुंबई येथील रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मान्सूनपूर्वी मार्ग होणार खुला?
या ठिकाणी आतापर्यंत एकूण सात गर्डर टाकण्यात आले आहे. आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी माती खोदण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या १५ एप्रिल पर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती रेल्वे निर्माण विभागाचे उपअभियंता पंकज धाबारे यांनी ‘लोकमत’ला दिली. येत्या मान्सूनपूर्वी हा मार्ग खुला करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी पोकलेनच्या साह्याने खोदकाम सुरू असून मजुरांकडूनही या ठिकाणी काम सुरू आहे.
खासदारांचे खडे बोल
२५ फेब्रुवारी रोजी डीआरएम, खासदार उन्मेष पाटील व नशिराबादच्या लोकप्रतिनिधींची बैठक झाली. खासदारांनी या कामास विलंब होत असल्याबद्दल संताप व्यक्त करीत अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. बोगद्याचे काम होत नाही तोपर्यंत गेट खुले करा, अशा सूचना यावेळी दिल्या. यानंतर तातडीने सुत्रे फिरली व कामाला सुरुवात झाली.
भुयारी मार्गाला न्याय मिळाल्याचे समाधान
जळगाव, जामनेर, पाचोरा, यावल या चार तालुक्यांना जोडणारा हा मार्ग कायमस्वरूपी बंद होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार होते. भादली रेल्वे गेट परिसरात सुमारे दीड ते दोन हजार एकर जमीन नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांची आहे. ती कसण्यासाठी त्यांना अवघड झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांची व्यथा मांडली होती. भुयारी मार्गाबाबत तब्बल सहा वर्ष लढा दिल्यानंतर आज न्याय मिळाला याचे समाधान असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.
भादली रेल्वे गेट संदर्भात कामाला गती यावी यासाठी विविध राजकीय पक्षांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने केले. अखेर त्याला यश आले आहे