रेल्वेने बांगला देशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 02:53 PM2020-07-12T14:53:44+5:302020-07-12T14:54:26+5:30
वासेफ पटेल भुसावळ , जि.जळगाव : मध्य रेल्वेने मे ते १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख ...
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेने मे ते १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख टनांहून अधिक कांद्याची निर्यात केली आहे. रेल्वेसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. यामुळे कोरोना आजारात शेतकऱ्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. तसेच शेजारी देश असलेल्या बांगला देशच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत.
भारताच्या कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक, मनमाड, कोपरगाव या भागातील शेतकरी कांद्याच्या या निर्यातीमुळे समाधानी आहे. शिवाय, शेतकरी, निर्यातदार, रेल्वे आणि बांगलादेशसाठीसुद्धा ही अनुकूल स्थिती आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी जसे कांदा इत्यादी करण्यात आलेल्या विनंतीनुसार रेल्वेने बांगला देशात कांद्याची निर्यात सुरू केली. १.२६२ लाख टन कांद्याने भरलेल्या ५५ मालगाड्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून आणि तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवले स्थानकांमधून बांगला देशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठविण्यात आल्या.
६ मे रोजी लासलगाव ते दर्शना, बांगलादेश येथे बांगलादेशात पाठविलेल्या पहिल्या रॅकपासून या निर्यातीची सुरुवात झाली. मे महिन्यातच कांद्याच्या २७ मालगाड्यांची निर्यात करण्यात आली. जूनमध्ये २३ मालगाड्यांची वाहतूक आणि जुलैमध्ये आतापर्यंत ५ मालगाड्या (रॅक्स) बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत.
पाठवलेल्या ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, निफाडहून ११, येवले येथून १०, खेरवाडी येथून ८, नाशिकहून ७ लासलगाव येथून ५ आणि कोपरगाव येथून एक रेल्वे अशा मालगाड्या पाठविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने माल वाहतूक करणाºयांशी नियमितपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांच्या परिणामस्वरूप बांगलादेशात कांद्यांची निर्यात झाली आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून माल वाहतुकदारांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. लोडिंग दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे आणि निर्जंतुकीकरणाच्या उपाय योजना केल्या जात आहेत.
कांद्याची लागवड करणारे चांदवड, नाशिक येथील प्रकाश बिकाजी सोनवणे यांनी सांगितले की, बांगलादेशात कांद्याची निर्यात व मालवाहतूक केल्याने चांगले पैसे मिळू शकले आणि रेल्वेने लोडिंगसाठी वॅगन उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वेचे आभार मानले. धुगाव, चांदवड येथील संतोष हरिभाऊ जाधव हे आणखी एक शेतकरी म्हणाले, कोरोना असूनही रेल्वेने केलेल्या वॅगनच्या तरतुदीमुळे या भागातील सर्व शेतक-यांना कांद्याच्या निर्यातीतून काही पैसे मिळविण्यास मदत झाली आणि रेल्वेने वेळेवर केलेल्या या मदतीसाठी आभारही मानले.
रेल्वे माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने मोठ्या मालवाहतूक करणा-यां ग्राहका समवेत आभासी (व्हर्च्युअल) बैठक आयोजित केली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व विभागीय स्तरावरसुद्धा अशाच बैठका घेण्यात येत आहेत.