पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेने मनपाला दिले नवीन डिझाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:25+5:302021-08-14T04:21:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू करून अडीच वर्षात देखील या पुलाचे काम अद्याप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम सुरू करून अडीच वर्षात देखील या पुलाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही, तर दुसरीकडे चार वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेल्या पिंप्राळा रेल्वे गेटवरील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही. आता रेल्वे प्रशासनाने मनपाकडे पुलालगत असलेल्या आर्मसाठी नवीन डिझाईन दिले आहे. तत्काळ ही जागा भूसंपादित करून मनपाच्या ताब्यात घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
२०१६ मध्ये पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली होती. तसेच हे काम रेल्वेच्या महारेलमार्फत केले जाणार आहे. मात्र, गेल्या चार वर्षात या पुलाच्या कामाला सुरुवात देखील झालेली नाही. पुलालगत भोईटेनगरकडून आर्मची मागणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र, या आर्ममुळे चार मालमत्ता बाधित होणार आहेत. बाधित मालमत्ता या खासगी वाटाघाटीतून ताब्यात घेऊन, याठिकाणी या आर्मचे काम केले जाणार आहे. आधी रेल्वेने दिलेल्या डिझाईनमध्ये पाच मालमत्ता बाधित होणार होत्या. आता नव्याने दिलेल्या डिझाईनमध्ये ४ मालमत्ता बाधित होणार आहेत. मनपाकडून पुढील आठवड्यात याबाबत सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.