‘अमृत’च्या रखडलेल्या कामाला रेल्वेचा हिरवा कंदील, रेल्वे रुळाखालून पाईपलाईन टाकणार
By सुनील पाटील | Published: April 5, 2023 07:35 PM2023-04-05T19:35:04+5:302023-04-05T19:35:23+5:30
महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळत नव्हती.
जळगाव : रेल्वे रुळाखालून अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्याच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असून दोन्ही यंत्रणांमध्ये करार होऊन आठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पिंप्राळा रेल्वे गेट, ममुराबाद रोड व ब्राम्हणसभा या तीन ठिकाणी रेल्वे रुळाखालून पाईप लाईन टाकायची असल्याने अमृत योजनेचे काम रखडले होते. महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे निधी वर्ग केला होता, मात्र तांत्रिक अडचणीमुळे हा निधी रेल्वेच्या खात्यात जमा झाला नव्हता. मार्च अखेर हा निधीही रेल्वेला प्राप्त झाला असून रेल्वे प्रशासनाने रुळाखालून पाईप लाईन टाकण्याला मंजुरी दिली आहे.
जळगाव शहरात गेल्या सहा वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरु आहे. परंतु कोणत्या न कोणत्या कारणांमुळे ही योजना सहा वर्षांपासून रेंगाळत आहे. आता देखील अमृतच्या कामामध्ये एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. अमृत योजनेअंतर्गंत सुरु असलेल्या जलवाहिनी व मलनिस्सारण लाईनचे काम ३ महिन्यापासून रखडले आहे. रेल्वे रुळाखालून जलवाहिनी व भूमिगत गटार टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळावी याकरीता महापालिकेने रेल्वे प्रशासनाला ३ कोटी रुपये वर्ग केले परंतु रेल्वेच्या बँक खात्यात ती रक्कम जमा न झाल्यामुळे रेल्वेकडून महापालिकेला परवानगी मिळालेली नव्हती.
महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळत नव्हती. खासदार उन्मेश पाटील यांनी महापालिकेत आढावा बैठकीतही हा मुद्दा ऐरणीवर आला होता. खासदारांनी यात लक्ष घातल्याने रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. अर्थात निधी खात्यात जमा झाल्यावरच रेल्वेने मंजुरी दिली. आता दोन्ही यंत्रणांमध्ये करार होणार आहे.