लाॅकडाऊनमध्ये मालवाहतुकीतून रेल्वेने उत्पन्नाची काढली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:06+5:302021-07-04T04:12:06+5:30
वासेफ पटेल लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : लाॅकडाऊनमध्ये मालवाहतुकीतून रेल्वेने उत्पन्नाची भर काढली असल्याची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य ...
वासेफ पटेल
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : लाॅकडाऊनमध्ये मालवाहतुकीतून रेल्वेने उत्पन्नाची भर काढली असल्याची माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखतीत दिली.
प्रश्न : कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर काय परिणाम झाला?
उत्तर : इतिहासात प्रथमच कोरोना लॉकडाऊनमुळे भुसावळ विभागच नव्हे, तर देशातील प्रवासी रेल्वेगाड्या बंद होत्या. अर्थातच याचा परिणाम प्रवासी गाड्यावर झाला. रेल्वेगाड्या अनेक दिवसांपर्यंत बंद होत्या. याचा त्यावेळेस रेल्वेच्या उत्पन्नावर खूपच परिणाम झाला होता. अनलाॅकनंतर काही प्रमाणात स्थिती सामान्य झाली होती.
प्रश्न : लाॅकडाऊनमध्ये झालेले नुकसान कसे भरून काढले?
उत्तर : कोरोना लाॅकडाऊनचा परिणाम सर्व उद्योग, व्यवसायावर झाला. मात्र, अशातही रेल्वेने विक्रमी माल वाहतूक केली. विशेषत: प्रवासी गाड्या बंद असताना व व्यावसायिकांचे अतोनात हाल असताना रेल्वेने प्राथमिकतेने मालवाहतूक गाड्या सुरू केल्या. प्रथम किसान एक्स्प्रेस देवळाली ते मुजफ्फरपूर या दरम्यान शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरिता सुरू करण्यात आली होती व त्यास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रश्न : मालवाहतुकीत रेल्वेचे उत्पन्न कसे वाढले?
उत्तर : लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाचे पर्याय असताना रेल्वेने व्यावसायिकांसाठी मालवाहतूक गाड्या सुरू केल्या. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या दरम्यान ५.२ दशलक्षचे उद्दिष्ट असताना रेल्वेने ५.७६ दशलक्ष मालाची वाहतूक केली, ही रेल्वेची विक्रमी मालवाहतूक आहे.
प्रश्न : भुसावळ रेल्वे विभागाने शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या ?
उत्तर : जळगाव जिल्ह्यातील केळीची देशात नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. याकरिता रावेर ते दिल्ली व सावदा ते दिल्ली मागणीनुसार केळी व इतर फळपिकांसाठी मालवाहतूक गाड्या सोडण्यात आल्या. याशिवाय लासलगाव ते फतवा बिहार, यूपी, पश्चिम बंगालसाठी गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
प्रश्न : कोरोना काळात रेल्वेने कोणती प्रलंबित कामे केली?
उत्तर : कोरोनापूर्वी गाड्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे मेंटेनन्स सिग्नलिंगची कामे त्या वेळेस पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हती. मात्र, कोरोना लाॅकडाऊनमध्ये गाड्यांची संख्या घटल्यामुळे रेल्वे ब्लॉकसह नवीन सर्व मेंटेनन्सचे कार्य करण्यात आले.
प्रश्न : प्रवासी गाड्यांच्या संख्येत आता वाढ होईल का?
उत्तर : नक्कीच ज्या-ज्या वेळेस परिस्थिती सामान्य होत गेली, त्या-त्या वेळेस रेल्वेने विशेष गाड्या प्रवाशांसाठी सोडल्या आहेत. मात्र, गाड्यांची संख्या किती प्रमाणात सोडण्यात यावी हे रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार नियोजन करावे लागते.
प्रश्न : रेल्वेस्थानकावर कोरोनाचे नियम पाळले जातात का?
उत्तर : नक्कीच. स्थानकावर उद्घोषणेद्वारा मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे याविषयी सूचना करण्यात येतात. तरीही कोणी जर नियमाचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. आतापर्यंत जवळपास भुसावळ विभागात दीड हजार लोकांवर दोन लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.