शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:17 AM2020-12-31T04:17:16+5:302020-12-31T04:17:16+5:30
जळगाव : तालुक्यात होणाऱ्या ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दी होऊन अर्जांचा पाऊस ...
जळगाव : तालुक्यात होणाऱ्या ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दी होऊन अर्जांचा पाऊस पडला. एकाच दिवसात ७३० अर्ज दाखल झाले असून, एकूण ४३ ग्रामपंचायतींसाठी एक हजार ५४६ अर्ज दाखल झाले.
जळगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशीही केवळ दोनच अर्ज दाखल झाले होते. त्यांनतर तीन दिवस सुट्या आल्या. त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. यात सोमवारी १५८ अर्ज, मंगळवारी ही संख्या वाढून ६५६ अर्ज व उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी ७३० अर्ज दाखल झाले.
ऑफलाइन पद्धतीनेही स्वीकारले अर्ज
ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज स्वीकारण्यात आले. शिवाय वेळही वाढवून देण्यात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी लगबग होती व उमेदवारी अर्ज जास्त असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
सर्वाधिक अर्ज नशिराबादचे
बुधवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांमध्ये सर्वाधिक ५१ अर्ज नशिराबाद ग्रामपंचायतसाठी दाखल झाले. त्या खालोखाल शिरसोली प्र.बो. ४५, म्हसावद ४३, आव्हाणे ग्रामपंचायतसाठी ३९ अर्ज दाखल झाले. सर्वात कमी दोन अर्ज आवार ग्रामपंचायतसाठी दाखल झाले.
वि.का. सोसायटी चेअरमनसह माजी सरपंचही रिंगणात
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वेगवेगळे पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात ममुराबाद वि.का. सोसायटीचे चेअरमन परिक्षित ढाके निवडणूक रिंगणात आहेत. या सोबतच पं.स. सदस्य ॲड. हर्षल चौधरी यांच्या पत्नी प्रियंका चौधरी, आव्हाणे येथील माजी सरपंच मीराबाई विजय पाटील हे आव्हाणे येथील प्रभाग क्रमांक दोनमधून एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे. काॅंग्रेसचे पदाधिकारी संजय वराडे यांच्या पत्नी ज्योती वराडे यांचा चिंचोली येथील वाॅर्ड एकमधून अर्ज दाखल आहे.