भोलाणे गावात पावसाचे पाणी शिरले अनेक घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:05 AM2018-06-26T01:05:06+5:302018-06-26T01:06:22+5:30
घरांसोबतच शेतीचेही नुकसान
पारोळा, जि.जळगाव : पारोळा तालुक्यातील भोलाणे येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून, नराणे नदी व दोन्ही बाजूंना असलेल्या नाल्यांना पूर आला आहे. यामुळे हेच पाणी नदी-नाल्याकाठी असलेल्या घरांमध्ये शिरले आहे. यात अनेक जणांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. याशिवाय पुराच्या या पाण्यामुळे शेतांमधील बांध फुटले असून, शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
भोलाणे गावात नदी व नाल्याकाठी रहात असलेल्या हिरालाल बहादूर पाटील, चतुर पाटील, विष्णू व्यंकट पाटील, सुधाकर भगवान पाटील, प्रकाश अर्जुन करंजे या ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. घरात साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
तसेच पुराचे पाणी अनेक शेतांत शिरल्याने अनेक शेतातील बांध फुटले आहेत. पावसाच्या पाण्यासोबत शेतातील माती, पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
इंदासी धरण भरले
या भोलाने गावानजीक असलेले इंदासी धरण ८० टक्के भरले. या धरणातून भोलाणे, पिंपळकोठा, वसंतनगर, जीराळी इंधवे, महालपूर या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आहेत. हे धरण कोरडेठाक झाले होते. या सर्व गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. पण धरण भरल्याने या सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.