परतीच्या पावसाने जळगावात दाणादाण, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:54 PM2018-09-20T12:54:19+5:302018-09-20T12:55:12+5:30
बजरंग बोगदा पुन्हा तुंबला
जळगाव : शहरात दुपारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र दाणादाण केली. न्यायालय आवारात वृक्ष उन्मळून पोलिसाच्या दुचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. याचबरोबर बजरंग बोगद्यात पुन्हा पाणी साचून या ठिकाणची वाहतूक बंद पडली. दरम्यान अचानक आलेल्या पावसाने काही गणेश मंडळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.
पंधरा दिवसांपूर्वीच नवीन बजरंग बोगद्यातील पाण्याचा निचरा करुन, हा बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला होता. पावसाचे पाणी साचू नये यासाठी गटारीचे कामही केले होते. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बुधवारी झालेल्या पावसाने पहिल्यासारखी स्थिती निर्माण निर्माण झाली. अर्धा तास चाललेल्या पावसात बोगद्यात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नवीन बोगद्याचे पाणी थेट रस्त्यापर्यंत आले होते. तर जुन्या बोगद्याच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावरचे पाणी बोगद्याकडेच येत असल्याने या ठिकाणींही पाणी साचून वाहतूकदेखील ठप्प झाली होती. तासाभराने नव्या बोगद्यातील पाण्याचा निचरा झाल्यावर वाहतूक सुरळीत झाली.
एमआयडीसीत विजेचा खांब कोसळला
पाऊस सुरु झाल्यानंतर वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये मुख्य लाईनवरील विद्युत खांब कोसळला. यामध्ये या भागात व इतर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. घटनेची माहिती मिळताच, महावितरणच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन, युद्ध पातळीवर काम सुरु केले. सायंकाळी या भागातला वीज पुरवठा सुरळीत झाला. तसेच सिद्धार्थ कॉलनी येथेही वीज तारांवर झाड कोसळल्याची घटना घडली. शहर कार्यकारी अभियंता संजय तडवी व त्यांच्या कर्मचाºयांनी युद्ध पातळीवर काम करुन या ठिकाणचाही वीज सायंकाळपर्यंत सुरु केला. तर मयूर कॉलनी, गणपती नगर, निसर्ग कॉलनी, खंडेराव नगर या भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता?
अनेक ठिकाणी झाडे कोसळली
वाºयामुळे शहरातील विविध भागात डेरेदार वृक्षांसह झाडांच्या फांद्यादेखील तुटून पडल्या. यामध्ये भास्कर मार्केट जवळ २ झाडे, नवजीवन मंगल कार्यालय १, आर.आर.शाळेजवळ १, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान १, एमजे कॉलेजजवळील आस्वादचौक १ व बेंडाळे कॉलेजसमोररस्त्यावरील दुभाजकामध्ये लावलेले झाड कोसळले. यामुळे काही ठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. तररस्त्यावरील सखल भागात पाण्याच्या डाबा तुंबल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
न्यायालय परिसरात वृक्ष कोसळले, दोन दुचाकींचे नुकसान
अचानक झालेल्या वादळ व पावसामुळे बुधवारी दुपारी चार वाजता न्यायालय आवारात पोलीस चौकीला लागून असलेले वृक्ष कोसळले. सुदैवाने त्यावेळी या वृक्षाजवळ कोणीत नव्हते, मात्र यात दोन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या दुचाकीचे (क्र.एम.एच. १९ बी.वाय ५८६२) प्रचंड नुकसान झाले. उजव्या बाजुचे हॅँडल तुटले तर दुसºया दुचाकीचे (क्र.एम.एच.१९ बी.बी. ७२७६) नुकसान झाले.