पाऊस उडाला आकाशी, ऊन सावलीचा खेळ पिकाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:50+5:302021-07-07T04:19:50+5:30
भडगाव : मागील वर्षाची या तारखेपर्यंत खरीप हंगाम पेरणी व पावसाची स्थिती पाहिल्यास यंदा पावसाचा सरिपाटाचा खेळ ‘कभी ...
भडगाव : मागील वर्षाची या तारखेपर्यंत खरीप हंगाम पेरणी व पावसाची स्थिती पाहिल्यास यंदा पावसाचा सरिपाटाचा खेळ ‘कभी हा, कभी ना’ असा सुरू आहे. परिणामी, मागील वर्षी भडगाव तालुक्यात शंभर टक्के पेरण्या होऊन पाऊसही चांगला होता. यंदा मात्र तालुक्यात फक्त ८७ टक्के पीक पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे पाऊसही उशिरा अन् पीक पेरण्याही उशिरा झाल्या. या सर्व पिकांची तापमानाने लाहीलाही होत आहे. पिके पाण्यासाठी ‘आ’ वासून आहेत. भडगाव तालुक्यात ३०५७५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगाम नुकसानाच्या वाटेवर दिसत आहे.
अजून आठवडाभरात पाऊस पडला नाही तर दुबार पीक पेरणी करावी लागते की काय? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेती कामांना वेग अन् पावसाला ब्रेक, अशी स्थिती आहे. सध्या रोज ढगाळ व पावसाचे वातावरण होते. ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे.
भडगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या कपाशी, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांसह एकूण ३० हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या करण्यात आल्या. म्हणजे आतापर्यंत तालुक्यात ८७ टक्के पीक पेरण्या झाल्या आहेत; मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यात उर्वरित १३ टक्के खरिपाच्या पेरण्या पिछाडीवर असून, खोळंबल्या आहेत. भडगाव तालुक्यात आतापर्यंत पाऊस एकूण १४० मीमी बरसल्याची प्रशासनाने नोंद केली आहे. मागील वर्षाची स्थिती पाहिल्यास तालुक्यात जून महिन्यात चांगला पाऊस बरसल्याने या तारखेपर्यंत शंभर टक्के पीक पेरण्या होत. मागील वर्षी आतापर्यंतच्या तारखेपर्यंत पाऊसही १७३ मीमी. पडल्याची नोंद आहे. तालुक्यात शेवटचा पाऊस २८ जूनला झाला होता. त्यानंतर ४ रोजी भडगाव तालुक्यात फक्त खेडगाव शिवारात ठराविक ठिकाणीच पाऊस झाला आहे. मृग नक्षत्र ५० टक्के कोरडा गेला. सध्या आश्विन नक्षत्र सुरू आहे; मात्र तेही कोरडेच जात आहे. अजूनही आठवडाभर पाऊस पडला नाही तर खरीप हंगामाचे पूर्णत: नुकसान होऊ शकते. शेतकऱ्यांवर दुबार पीक पेरण्यांची वेळ येऊ शकते.
यंदाची पीक परिस्थिती (हेक्टर)
कापूस-२४ हजार ८००
बागायत-१६ हजार
जिरायत क्षेत्र ८, ८००
ज्वारी : ७५०
बाजरी-६७५
मका-२४५०
मूग-७५०
उडीद-६७५
सोयाबीन-४७५
भडगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ३० हजार ५७५ हेक्टरवर पीक पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत पाऊस १४० मी. मी. झाला आहे. पिकांना पावसाची आवश्यकता आहे. आठवडाभरात पाऊस न पडल्यास पिकांच्या नुकसानाची शक्यता आहे. दुबार पेरणीची शक्यताही नाकारता येत नाही.
-बी. बी. गोरडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव.