आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:55+5:302021-01-08T04:48:55+5:30
जळगाव - गेल्या आठवडाभरात तापमानात वाढ होत असून, शहरात ढगाळ वातावरण कायम आहे. थंडीचा कडाकादेखील कमी झाला असून, ...
जळगाव - गेल्या आठवडाभरात तापमानात वाढ होत असून, शहरात ढगाळ वातावरण कायम आहे. थंडीचा कडाकादेखील कमी झाला असून, आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तसेच सकाळच्या वेळेस वातावरणात धुकेदेखील कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे रब्बीच्या हंगामावरदेखील परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. १५ जानेवारीपर्यंत थंडी गायब राहण्याचाही अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
अमृतच्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
जळगाव- शहरात अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून, यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कोंबडी बाजार परिसरात बुधवारी सायंकाळी या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. मनपा प्रशासनाने भुयारी गटार योजनेच्या निविदेत खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची दुरुस्तीची जबाबदारी मक्तेदारावर सोपविली नाही. यामुळे खोदकाम झाल्यानंतर खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने खड्ड्यांची समस्या भयंकर स्वरूप घेताना दिसून येत आहे.
आव्हाण्याच्या बोरांचा जीआय मानांकनासाठी प्रस्ताव
जळगाव - अर्थसहाय्य योजनेंतर्गत भौगोलिक चिन्हांकन (जीआय) मानांकनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दालनात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यामध्ये जिल्ह्यातील विविध कृषी उत्पादनांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. जिल्ह्यातील केळी व भरताच्या वांग्यांना याआधीच जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. यंदा बोरांचे प्रस्ताव समितीसमोर सादर करण्यात आले आहेत. तालुक्यातील आव्हाणे येथील आदर्श शेतकरी समाधान पाटील यांनी विशेष गुणधर्म असलेले बोरांचा प्रस्ताव सादर केला आहे. समितीकडून पाहणी केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.