जळगावात पाऊस, वाऱ्यात झाडे पडली; खांब पडले, वीजही गेली!
By अमित महाबळ | Published: June 13, 2024 08:21 PM2024-06-13T20:21:06+5:302024-06-13T20:22:07+5:30
तोपर्यंत उकाड्याने नागरिक घामाघूम झाले होते.
अमित महाबळ, जळगाव : जोरदार वारे व पावसाने हजेरी लावताच जळगाव शहरातील वीजपुरवठा बंद झाला. आर. आर. शाळेजवळ वीज यंत्रणेवर झाडे पडून दोन खांब वाकले, त्यामुळे दुरस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा पेठ, क्रीडा संकूल भागातील घरे व कार्यालये अंधारातच होती. तोपर्यंत उकाड्याने नागरिक घामाघूम झाले होते.
गुरुवारी, सायंकाळी पावसाने हजेरी लावली. थोड्याच वेळात जोरदार वारेही आले. या दरम्यान वीज यंत्रणेवर झाडे पडून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सुमारे पाऊण तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सर्वांकडून ऑल क्लिअरचा मेसेज आल्यानंतर तो पूर्ववत सुरू करण्यात आला. मात्र, जिल्हा पेठ, क्रीडा संकूल भाग अंधारातच होता. आर. आर. शाळेजवळ वीज यंत्रणेवर झाडे पडल्याने दोन खांब वाकले होते. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा लागलीच सुरळीत होऊ शकला नाही. महावितरणने दुरुस्तीचे काम हाती घेतले. ते पूर्ण होईपर्यंत हा भाग अंधारात होता. या दरम्यान, अनेकांनी जनरेटरचा आसरा घेतला. याशिवाय शहरात वीज यंत्रणेचे नुकसान झाल्याची कोणतीही नोंद महावितरणकडे झालेली नव्हती.
लागलीच दुरुस्तीचे काम...
पाऊस, जोरदार वाऱ्याने आर. आर. शाळेजवळ झाडे पडून दोन वीज खांब वाकले. जागेवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा बराच वेळ बंद होता. शहरात अन्यत्र वीज यंत्रणेचे नुकसान झालेले नाही. परंतु, वादळी पावसात खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती महावितरणचे जळगाव शहर कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी दिली.