आगामी तीन दिवस पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:00+5:302020-12-14T04:31:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात कमी दाबाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे महाराष्ट्र ते मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. यासह दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस जिल्ह्यात पावसाचा व ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. अरबी समुद्रात तीन समुद्रस्तरापासून तीन किमीपर्यंत हवेचा दाब तयार झाला आहे. तसेच समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात मोठा बदल झालेला दिसून येत आहे.
हिवाळ्यात अनुभवायला मिळणार पावसाळा
यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाला असला तरी ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेडून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटीन भाषेत ‘ला लिना’ असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याचे तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे बाष्पयुक्त वाºयांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाची स्थिती राहणार आहे. डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यासह जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील यंदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गहू, हरभऱ्याला फायदा मका, ज्वारीला मात्र फटका
अवकाळी पावसामुळे गहू व हरभऱ्याच्या पिकाला काही प्रमाणात फायदा झाला आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे मक्यावर व ज्वारीवर कीड पडण्याची भीती आहे. यासह भाजीपाल्याचा पिकांवरदेखील या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. गहू व हरभरा आता प्राथमिक स्वरूपात आहे. यामुळे गव्हाला पाण्याची गरजच आहे. त्यातच पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होत आहे.
सीसीआयने कापूस खरेदी थांबली
दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तसेच आगामी तीन दिवसदेखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे सीसीआयने कापसाची खरेदी थांबवली आहे. तरीही अनेक केंद्रांवर शेतकरी आपला माल विक्रीसाठी रांगेत लागला आहे. पावसामुळे कापूस ओला होण्याची शक्यता आहे. यामुळे सीसीआयने शुक्रवारपर्यंत खरेदी थांबवली आहे.