पाऊस : रूपे अगाध तुझी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:40 AM2018-06-13T00:40:00+5:302018-06-14T00:57:06+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये प्रासंगिक या सदरात साहित्यिक जिजाबराव वाघ यांनी पावसाचे काव्यरूपी केलेले वर्णन.
पाऊस... ओल्या नक्षत्रांचे घमघमणारे आभाळ... नवसृजनाची प्रतिभागंधीत माळ... पावसाची रुपेही अगाध. तप्त धरतीची कुस उजवून तिची हिरवी ओटी भरणारा... मन मातीवर थेंब ओल्या शब्दांची अलवार रांगोळी रेखाटणारा. समस्त कवी कुलास तर पावसाची अगणित रूपे करतात भावविभोर. आयुष्याच्या शुष्क फेसबुक अन् व्हॉटसअपच्या पदरावर चिंब प्रतिमांचे मोर चितारुन... पाऊस तनमनाला कवेत घेतो. रोमांचित करतो..! भरल्या आभाळाच्या साक्षीनं शब्दांना ढगांचा आकार मिळतो. पावसाचा प्रवास अदिम. अनादी आणि अनंतही. स्थलकालानुसार कवींच्या शब्दांमधून पाझरलेल्या पावसाची काही लडीवाळ तर काही फटकारे मारणारी रूपे. आनंदाचा हंगाम देऊन भेटत राहतात दरवर्षी ताजेपणानं...
ऊन जरा जास्त आहे. असं म्हणत दरवर्षी काहिली करणाऱ्या दिवसात रुतूचक्राभोवती फिरणारी कालदर्शिकेची पानं पालटली जातात आपसुक. यातील चार पानं असतात पावसाळ्याची. म्हटलं तर नियतकाल. साधारण चार महिन्यांचा. उभ्या रानाला चिंब साज देणारा... इंद्रधनू पालखीचा... काळ्या-कभिन्न मेघांचा... गोंधलेल्या धरणीचा... कवी मनाला सृजनाचं दान देणारा...
हा रुतू असतो पाऊस गाण्यांचा आणि कवितांचाही. पाऊस जसा गर्द मेघातून डोकावतो. तसा तो खूप प्राचीन म्हणून संतसाहित्यातूनही भेटतो. अर्थात यातील त्याची जातकुळी निराळी म्हणता येईल. अभंग, विराण्यांमधील त्याचं रुपदेखील वेगळं. संदर्भही वेगळे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी
‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा..’ अशा अध्यात्म लयीत पावसाला टिपलंय. भगवंताच्या भेटीची आस यातून स्वच्छ दिसते. वणवे पेटताय. सूर्य आग ओकतोय. काहिलीच्या तडाख्याने भाजून निघणाºया कवींसाठी पावसाची ओढ अनिवार अशीच. याच आळवणीतून केशवसुतांनी... ‘ऐशी होऊनिया दशा दिवस ते झाले बहु, पावसा ये आता तर तू, त्वरा करुनिया लंकेवरुनी असा. झंझावात यावरी बसुनिया या पश्चिमाब्धीवरी लाटा झोडित, गर्जना करित ये, बा मेघराजा, तरी...’ असं साकडं पावसाला घातलंय. आपला आर्तस्वर पावसाच्या कानापर्यंत पोहचलाय, असं वाटतं आणि आभाळ भरुनही येतं. कोणत्याही क्षणी त्याचा बांध फुटेल. इतकी दाटीवाटी असतानाही तो स्थिर चित्तच. पावसाचे हेच रुप आरती प्रभू...
‘जमतें आहे ढगात पाणी,
अजून परंतु ढगचि फुटेना, आणि विजेचा जराजराही त्या पाण्यातून देठ तुटेना...’ अशा हेकेखोर शब्दात पकडतात. शिगोशिग भरलेलं आभाळ कोसळलं की, ना.घ.देशपांडे यांच्यासारखा कवी...‘चिंब झाली पावसाने रानोवने, वर्षती येथे सखीची पावसाळी लोचने’ अशी ओली काजळरेषा उमटवून जातो. पावसाची ही धुंद सफर बा.भ.बोरकर गुढरम्य गुंजनात ऐकवून जातात. ती अशी... ‘मल्हाराची जळांत धून, वीज नाचते अधुनमधुन, वनात गेला मोर भिजून, घुमतो पांवा सांग कुठून?’ बा.भ.बोरकर यांचा हाच भाव पुढे नेताना मंगेश पाडगावकर लिहितात... ‘कोसळली सर दक्षिण उत्तर, घमघमले मातींतुनि अत्तर, अष्टदिशांतुन अभीष्टचिंतन, घुमला जयजयकार, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार...’
‘चिंब पावसानं रान झालं आबादानि' पावसाच्या कौतुक सोहळ्याचे असे ढोल वाजविणारी ना.धों.महानोर यांची कविता पावसाचे अनेकविध रंगही दाखवते... ‘पाऊस रात्रीचा कभिन्ह-माध्यान्ही धसमुसता, काळा, वैºयासारखा...’ असे भयकंपीत दर्शनदेखील महानोर यांची कविता घडविते. ‘बाई पाऊस पाऊस कोसळतो एकचित्त, खमंग लोणच्याशी हवा वाफेचाच भात...' पावसाची अशी साजूक सात्विकता इंदिरा संत यांच्या कवितांमधून भेटते. कोसळत्या पावसात आळवणी करताना ‘ग्रेस’ लिहून जातात... ‘पाऊस आला पाऊस आला गारांचा वर्षाव, गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव...’ अवलिया सुरेश भटांचा बाजच वेगळा. कडक तितकाच मऊसूत. ‘काळ्याकाळ्या मेघांआडुन, क्षणभर चमकुन गेली बिजली, जणू मोकळ्या केसांमधुनी, पाठ तुझी मज गोरी दिसली...’ भटांच्या गझलेतील हा रोमान्स मोहवून टाकतो.
हरेक कवी, साहित्यिकाची अनुभूती देणारी वाट वेगळी असते. म्हणूनच नामदेव ढसाळ... ‘जारे जारे पावसा, तुला देतो पैसा... वादळी सामुद्रिकात शरणावत झोपड्यांची करवंदी कलेवरे...पावसाला पोळवा, पावसाला भाजवा, विस्तव आणा विस्तव पाडा...’ असं खणखणीत पावसालाच सुनावून टाकतात. खरंच पाऊस नसतो हळवा. दि.पु.चित्रे यांच्या कवितेतून ते ठाशीवपणे उमटते... ‘पाऊस पाऊस पाऊस, थेंबांचे तुटले ऊस, उघडा झाला माझा गळा, उफराटा उगवला मळा...’
काळ बदलतोय. पावसाची रुपेही बदललीय. तथापि, त्याच्यातील सृजन पेरा मात्र कदापि लुप्त होणार नाही. तो अनादी आणि अदिम, अनंत असला तरी प्रत्येक रुतूत तो असतो मोहतुंबी. ताजाही. जोवर पाऊस आहे, तोवर शब्दांनाही ओल राहणारच. आॅनलाईन आणि आॅफलाईन युगातही त्याने आपली सादगी जपलीय चिरंतन...
-जिजाबराव वाघ