वादळी वाऱ्यासह पावसाचे धूमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:08+5:302021-05-28T04:14:08+5:30
आडगाव, ता. चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान वादळी पावसाने जोरदार धूमशान घातले. अनेक ...
आडगाव, ता. चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेदरम्यान वादळी पावसाने जोरदार धूमशान घातले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक शेतांमधील गोठ्यांवरील पत्रे उडाली. अनेक चारचाकी वाहनांवर झाडे कोसळली. यामुळे या वाहनांचे मोठे नुकसान झाले.
आडगावसह परिसराला सव्वाचार वाजताच्या सुमारास वादळी पावसाने चांगलेच झोडपले. वादळाने चांगलेच धूमशान घातल्याने मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर काही अर्ध्यावर मोडली. या वादळाने येथील कमलाकर तोताराम पाटील यांची तसेच राजेंद्र चिंधा पाटील यांच्या मालकीच्या चारचाकी वाहने झाडाखाली दबल्या गेल्याने मोठे नुकसान झाले. काही घरे व शेतातील गोठ्यावरील पत्रे उडाली. वादळाचा व पावसाचा जोर इतका भयानक होता की शेतामध्ये शेततलावसारखे दृश्य दिसत होते. जवळपास पावणेदोन तास वादळी पावसाने आडगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले.
ज्यांची शेती मशागत बाकी आहे त्यांच्यासाठी गुरुवारी झालेला पाऊस फायद्याचा आहे. ज्यांनी काही प्रमाणात कपाशी लावली व रोटाव्हेटर मारून शेतात ठिंबक नळ्या आंथरुण ठेवल्या त्यांच्यासाठी थोडे डोकेदुखी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वादळी पाण्याने ठिंबकच्या नळ्या एका ठिकाणी जमा करून ठेवल्या होत्या. तर शेतकऱ्यांनी पशुधनासाठी चारा व भुईमुगाच्या शेंगा शेतात उघड्यावर ठेवल्या होत्या. ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली.
वाघडूसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर वडाळा व उंबरखेड परिसरात अर्धा ते पाऊण तास मध्यम पाऊस झाला. या पावसाने कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि उगवण चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.