जळगाव तालुक्यात पावसाच्या शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:56+5:302021-05-03T04:11:56+5:30
जळगाव : तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी या भागात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. यामुळे ...
जळगाव : तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी या भागात रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. यासह तालुक्यातील भोकर, किनोद, कठोरा या भागात देखील पावसाने हजेरी लावली. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण कायम असल्याने, तापमानात काही प्रमाणात घट झाली होती.
कानळदा येथील अनधिकृत लसीकरणाबाबत चौकशी होणार
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी परिसरातील गाव पुढाऱ्यांच्या कुटुंबीयांना लस देण्याच्या प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच असे प्रकार इतर ठिकाणी घडत असतील तर याबाबत देखील चौकशी करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी रस्सीखेच
जळगाव : गेल्या महिन्यात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात अवघ्या आठ मतांनी पराभव पत्करलेल्या माजी नगरसेविका पुत्र जाकीर पठाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासह माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, नीलेश पाटील यांचे नाव देखील आघाडीवर आहे. पुढील आठवड्यात संपर्कप्रमुख संजय सावंत याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
गाळेधारकांचा संप सुरूच
जळगाव : मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या शहरातील १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांनी महिनाभरापासून पुकारलेला संप अजूनही कायम आहे. हा संप मागे घेण्याबाबत मनपा प्रशासन किंवा मनपा सत्ताधाऱ्यांकडून देखील कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून गाळेधारकांनी आपली दुकाने उघडली नसून, जोपर्यंत महापालिका प्रशासन गाळेधारकांना दिलेली अवाजवी बिलांची रक्कम कमी करणार नाही, तोवर हा संप कायम राहणार असल्याचा इशारा गाळेधारक संघटनेकडून देण्यात आला आहे.