सागर पार्कमध्ये पावसामुळे साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:13 AM2021-06-20T04:13:01+5:302021-06-20T04:13:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात असलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक असलेल्या सागर पार्कचा मनपातर्फे विकास केला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात असलेल्या मोजक्या मैदानांपैकी एक असलेल्या सागर पार्कचा मनपातर्फे विकास केला जात आहे. या मैदानात जॉगिंग ट्रॅकच्या काम प्रगतिपथावर आहे. मात्र चारही बाजूने जॉगिंग ट्रॅक केल्यावर मैदानात साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी सोय नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात मैदानात पाणी साचले होते. तसेच चिखलही झाला होता. त्यामुळे ट्रॅकचे काम करताना पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
सागर पार्कच्या मैदानाला जवळपास दीड मीटरचा उतार आहे. त्यामुळे पाऊस पडला की सर्व पाणी मैदानाच्या एका बाजूलाच वाहते. आधी जेव्हा मैदान खुले होते. तेव्हा मैदानातील पाणी जमिनीत जिरवण्यासाठी चारी करण्यात आली होती. मैदानातील पाणी वाहत जाऊन चारीत गोळा होत होते. त्यामुळे कितीही जोरदार पाऊस झाला तरी दोन दिवसांत मैदान पुन्हा कोरडे होत असे. मात्र आता मैदानाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत करण्यात आली आहे. तसेच जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे मैदानातील पाणी एकाच बाजूला वाहत जाते आणि तेथे साचून राहते. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मैदानात एका बाजूला पाणी साचले होते. त्यातच मैदानाचे गेट खुले असल्याने एका हौशी चालकाने आपली ऑफ रोड ड्रायव्हिंगची हौस मैदानात भागवली होती. त्याच्या गाडीच्या चाकांचे निशाण मैदानात सर्वत्र चांगलेच दिसून आले होते. त्यामुळे या मैदानात सांडपाण्याचा निचरा होण्याची नीट व्यवस्था करावी, तसेच पाणी जमिनीत जिरवण्यासाठी एका बाजूने चारी खोदावी, अशी मागणी या मैदानात दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
आयुक्तांकडे देखील केली होती मागणी
काही दिवस आधी मनपा आयुक्तांनी सागर पार्कच्या कामांची पाहणी केली होती. त्यावेळी देखील इंजिनियर्स असोसिएशनने या कामातील काही चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र अद्यापही त्यावर उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत.
कोट - मैदानात विकासकामे होण्याच्या आधी एक लहान चारी करण्यात आली होती. त्यात पावसाचे पाणी वाहत जात होते. आणि ते जमिनीत झिरपत असे. मात्र आता मैदानात संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. तसेच जॉगिंग ट्रॅकदेखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्थाच नाही. ही व्यवस्था करावी, अशी मागणी मनपाकडे करण्यात आली होती. - तुषार तोतला.