पावसासाठी वरुणराजाला साकडे, काढण्यात येताय धोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:07 AM2021-07-08T10:07:36+5:302021-07-08T10:10:08+5:30
पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अर्पण लोढा
वाकोद, ता. जामनेर : वाकोदसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गासह मजूर वर्गाच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. वाकोद येथे वरूणराजाला साकडे घालण्यासाठी पूर्वकालीन चालत आलेली प्रथा जोपासत धोंडी - धोंडी पाणी दे, साय माय पीकू दे म्हणत गावातून परमेश्वराला साकडे घालण्यात आले.
पावसाची दडी, पिकांची शेवटची घटका
गेल्या अनेक वर्षापासून अवेळी आणि अपुऱ्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याला नापिकीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कमालीचा धास्तावला आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी तरी बऱ्यापैकी पाऊस होईल या आशेने बी-बियाणे व खताची जुळवाजुळव केली. पावसानेही थोड्या प्रमाणात हजेरी लावल्याने शेतकरी पेरते झाले होते. मात्र पेरणी केलेली पिके बऱ्यापैकी अंकुरले असतानाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजताना दिसत आहेत.
रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ह्यधोंडी धोंडी पाणी देङ्घ
पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. दरम्यान, वाकोदसह परिसरात पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे याकरिता रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी ह्यधोंडी धोंडी पाणी देह्ण म्हणत वरुणराजाला साकडं घातलं जात आहे.
दुबार पेरणीचे संकट
मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हजेरी लावली. मात्र नंतर पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्यानं बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या नसून, तर काही ठिकाणी मात्र पावसाअभावी पिकं शेवटच्या घटका मोजत असून, ऑक्सीजनवर आहेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांना पेरता येईना तर काहींना पिकं जळून जाण्याची भीती आहे.