खान्देशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 08:25 PM2019-08-09T20:25:33+5:302019-08-09T21:47:03+5:30

नद्यांना पूर : ३ ठार तर अन्य दोघे पुरात बेपत्ता, अनेक मार्ग झाले ठप्प, घरांची पडझड

Rainfall in 4 talukas of Khandesh | खान्देशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

खान्देशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

googlenewsNext


जळगाव : गेल्या दोन- तीन दिवसांमध्ये खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. २५ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदी व नाल्यांना पूर आला असून या थैमानात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २ जणांना पुरात जलसमाधी मिळाली तर एका महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला. अन्य दोघे पुरात बेपत्ता झाले आहेत.
पावसाने विशेषत: धुळे व नंदुरबार जिल्ह्यात तर हाहाकार माजवला आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्व चार तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यांचा समावेश आहे, तर जळगाव जिल्ह्यातील १५ पैकी धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यात अतिवृष्टी झाली.
धुळे जिल्ह्यात दोघे वाहून गेले
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामखेली नदीच्या पुरात सामोडे येथे गुलाब पांडुरंग घरटे (वय ५७ वर्ष) तर शिरपुरला रशीद जमशेर मेहतर ( वय ५० वर्ष) हे अरुणावतीच्या पुरात वाहून गेले. दोघे पूर पाहण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत त्यांचा तपास लागला नाही. दरम्यान तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे. शिरपूर तालुक्यात फत्तेपूर फॉरेस्ट येथील मातीचे धरण (बंधारा) फुटल्याने त्यातील पाणी वाहून गेले. शिंदखेडा तालुक्यातील विखरण व तळवाडे मिळून ४१ घरांची पडझड झाली असून या दोन्ही गावांचा संपर्क तुटला. तेथील १०० तर सावळदे व वडदे येथील ५० अशा एकूण दीडशे जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात २ ठार
जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने संपुर्ण जिल्हा पाण्याखाली गेला आहे. रायखेड येथे भिंत पडून कालाबाई रायसिंग भिल (३५) या महिलेचा मृत्यू झाला. मौलीपाडा येथील नदीच्या पुरात लिलाबाई विजयसिंग पाडवी (५५) ही महिला वाहून गेली. तर रायखेड येथे भिंत पडल्याने कोपऱ्या विजयसिंग वसावे हा युवक जखमी झाला. अनेक भागात पूल तुटले असून जनजीवन ठप्प झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस शुक्रवारी दुपारपर्यंत कायम होता. सर्वच नदी, नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रस्ते, फरशीपूल वाहून गेले आहेत. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी शहादा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. शहादा शहर, वैजाली, डामरखेडा, आवगे, जुनवणे आणि शहादा तालुक्यातील इतर तालुक्यातील जवळपास २०० कुटूंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे. ४०० पेक्षा अधीक घरांची पडझड झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात कळमसरे येथे पाण्याचा वेढा
गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जामनेर येथे कांग नदीला आलेल्या पुरात वाहून समाधान सीताराम काळे (वय ६०, रा.जामनेर पुरा) यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. अमळनेर तालुक्यात तीन गावांमध्ये पुुलामुळे धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले असून कळमसरे गावास पाण्याचा वेढा पडला आहे. मुडी- वालखेडा पूल वाहून गेला आहे. बेटावद व सावखेडा पुलालाही पावसाच्या पाण्याचा धोका आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. तहसीलदारांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची रजा नामंजूर केली आहे. जिल्हा परिषद शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आदींना गावातच थांबण्याचा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे पावसामुळे भिंत कोसळली. मात्र नशिब बलवत्तर म्हणून घरात असलेले आई व दोन मुले बचावले.

Web Title: Rainfall in 4 talukas of Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.