जिल्ह्यात पाऊस नव्वदी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:17 PM2019-09-10T12:17:07+5:302019-09-10T12:17:57+5:30

सर्वाधिक १०८.६ मिमी पाऊस रावेर तालुक्यात : सर्वात कमी ७२.९ मिमी इतका पाऊस चाळीसगाव तालुक्यात

 Rainfall in the district surpasses ninety | जिल्ह्यात पाऊस नव्वदी पार

जिल्ह्यात पाऊस नव्वदी पार

Next


जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची नव्वदी पार केली आहे. जिल्ह्यात सोमवार, ९ सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९०.१ टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर इतके आहे. मागील वर्षी ९ सप्टेंबर २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६३ टक्के म्हणजेच ४१७.६ मिलीमीटर पाऊस पडला होता. यावर्षी मात्र ५१७.८ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. यात ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात वार्षिक सरासरीच्या १२.९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक १०८.६ टक्के इतका पाऊस रावेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच ७२.९ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात पडला आहे.
जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २५.४६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ४.४६ टीएमसी तर लघु प्रकल्पांमध्ये २.६४ टीएमसी असा एकूण ३२.५६ टीएमसी उपयुक्त साठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये केवळ ७१६.७५ दलघफु म्हणजेच २५.३१ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांचा पाणीसाठा वाढला असल्याने जिल्हावासीयांसह व शेतकऱ्यांच्यादृष्टिने अतिशय समाधानाची बाब आहे.
जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प आहे. अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गुळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे तेरा मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५०.४० टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये आजपर्यंत ६४.६० टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१० दलघमी म्हणजेच ३६.२६ टीएमसी साठा सोमवारी अखेर या प्रकल्पांमध्ये ७२१.०४ दलघमी म्हणजेच २५.४६ टीएमसी उपयुक्त साठा आहे.
यामध्ये हतनूर धरणात ४.६८ टीएमसी, गिरणा १५.५४ टीएमसी तर वाघूर धरणात ५.२४ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यंदा सोमवारपर्यंत हतनूर धरण क्षेत्रात ७८२ मिमी, गिरणा धरण क्षेत्रात ५४७ मिमी तर वाघूर धरण क्षेत्रात ८८६ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२० टीएमसी इतका असून सोमवार अखेर या प्रकल्पांमध्ये १२६.४५ दलघमी म्हणजेच ४.४६ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.
जिल्ह्यातील लघु प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १९६.५० दलघमी म्हणजेच ६.९३ टीएमसी इतका असून सोमवारअखेर या प्रकल्पांमध्ये ७४.६९ दलघमी म्हणजेच २.६४ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

हतनूर धरणाचे ६ दरवाजे उघडले
हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे सोमवारी धरणाचे ६ दरवाजे २ मीटरने उघडले असून धरणातून २७ हजार २१० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिली.

Web Title:  Rainfall in the district surpasses ninety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.