जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:45+5:302021-04-30T04:20:45+5:30
उकाड्यापासून मिळणार दिलासा : ‘मे’च्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व हजेरी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ...
उकाड्यापासून मिळणार दिलासा : ‘मे’च्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व हजेरी लावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत वाढला आहे. यामुळे जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असून, जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे लावलेल्या कडक निर्बंधांमुळे नागरिकांना कूलरदेखील खरेदी करता आले नसल्याने, जबरदस्त तापमानात नागरिकांची होरपळ होत आहे. मात्र, येत्या तीन दिवसांत जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे, त्यातच जिल्ह्यात १८ ते २० कि.मी. वेगाने उष्ण वारे वाहत असल्याने घरात थांबनेदेखील कठीण झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्री १० वाजेपर्यंतदेखील उष्णतेचा झळा कायम असल्याने, नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास तापमानात काहीअंशी घट होऊन पारा ३८ अंशापर्यंत येण्याचाही अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
काय आहे पावसाचे कारण
यंदा हवामान बदलामुळे प्रत्येक हंगामात आतापर्यंत पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आहे. सद्य:स्थितीत दक्षिण मध्यप्रदेश व विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रयुक्त हवेमुळे जिल्ह्यात आगामी तीन दिवस अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळेस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता ४५ टक्के इतकी आहे.
मेच्या शेवटच्या आठवड्यात
मान्सूनपूर्व सरी कोसळणार
यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत या प्रत्येक महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, स्कायमेट या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात सरासरीइतके पर्जन्यमान राहण्याची शक्यता असून, जिल्ह्यात १० ते १२ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.