पावसाचा ७४ गावांना फटका; सात तालुक्यात पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:13 PM2019-08-10T12:13:58+5:302019-08-10T12:16:30+5:30

अमळनरे तालुक्यात ३५ घरे पडली: सहा तालुक्यात १४० घरांच्या भिंती पडल्या, सहा बैल, १० बकऱ्या जखमी

Rainfall hits 4 villages; Flooding in seven talukas | पावसाचा ७४ गावांना फटका; सात तालुक्यात पूरस्थिती

पावसाचा ७४ गावांना फटका; सात तालुक्यात पूरस्थिती

Next

जळगाव : संततधार पावसामुळे तसेच तापी व पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापैकी रावेर वगळता चोपडा, यावल, पाचोरा, एरंडोल, धरणगाव व अमळनेर या सहा तालुक्यांमध्ये तब्बल ७४ गावे बाधीत झाली आहेत. अमळनेर तालुक्यात तर ३० गावांमधील ३५ घरे तर ६४ घरांच्या भिंती पडल्या आहेत. या सहा तालुक्यात मिळून १४० घरांच्या भिंती पडल्या आहेत. तर चोपडा तालुक्यात ४ घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने यात मनुष्यहानी झालेली नसली तरीही ६ बैल व १० बकºया जखमी झाल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात सर्वाधिक फटका
शुक्रवारी झालेल्या पावसाने तापी नदीवरील हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले. त्यामळे २ लाख ४८ हजार ५११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून ४९ हजार क्यूसेक विसर्ग होत असल्याने जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमळनेर तालुक्यातील कलाली गावाला पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता आहे. तसेच पांझरा नदीकाठच्या मांडळ, मुडी, ब्राह्मणे, बोदर्डे, कळंबे, भिलाली, शहापूर व निम या गावांपर्यंत पाणी पोहोचल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
९ बचाव पथके
उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी ९ बचाव पथके तयार करून या गावांमध्ये सज्ज ठेवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत फायबर बोटीसह बचाव पथक अमळनेर येथे रवाना केले आहे. तसेच अमळनेर तालुक्यातील मुडी व बोदर्डे या गावातील सुमारे १ हजार नागरिकांना मुडी येथील प्राथमिक शाळेत हलविले असून त्यांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बचाव साहित्याचे वितरण
अमळनेर, रावेर, जामनेर व जळगाव येथे चार नग फायबर बोटी व लाईफ जॅकेट, लाईफ रीग, सर्च लाईट, दोरखंड आदी साहित्य वितरीत करण्यात आले असून ते सज्ज ठेवण्यात आले आहे,
तालुकास्तरावर झाल्या आपत्कालीन नियोजनाच्या बैठक
जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात आॅगस्टच्या दुसºयाच आठवड्यात ६३.१ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ३९.९ टक्के पाऊस झाला होता. दरम्यान पावसाने उघडीप न दिल्याने शेतांमध्ये पाणीसाचून पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे कृषी विभागाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
गेल्या ४८ तासांपासून तर पावसाने संततधार लावली आहे. गुरूवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. एकाच दिवसांत जिल्ह्यात सरासरी ४८.१ मिमी पावसाने हजेरी लावली आहे. जळगाव तालुक्यात ५४.८ मिमी, जामनेर २२.८, एरंडोल ४४.८, धरणगाव ८१.३, भुसावळ ५२.४, यावल ७८.४, रावेर ५२.१, मुक्ताईनगर ५२, बोदवड ३३.३ , पाचोरा १८.६, चाळीसगाव ११, भडगाव २२.१, अमळनेर ७१.३, पारोळा ४०.०, चोपडा तालुक्यात ८७.१ मिमी पाऊस झाला.
एकाच तालुक्याची सरासरी ५० च्या आत
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी केवळ चाळीसगाव तालुक्याची पावसाची सरासरी ४८.४ टक्केच आहे. जळगाव तालुक्यात सरासरी ६२.१ टक्के, जामनेर ७३.६, एरंडोल ६६.२, धरणगाव ६३.५, भुसावळ ६९.८, यावल ७१.२, रावेर ६५.९, मुक्ताईनगर ७६, बोदवड ६३.६, पाचोरा ५७.९, भडगाव ५१.७, अमळनेर ५९.८, पारोळा ५७.७, चोपडा तालुक्यात ५८.६ टक्के पाऊस झाला आहे.
अमळनेर तालुक्याला धोका
धुळे येथील पांझरा नदीपात्रातून सध्या ४९ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील मुडी गावात पाणी शिरले आहे. याठिकाणी एक होडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अक्कलपाडा धरण क्षेत्रात रात्री पावसाचा वेग आणि पांझरा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्यास अमळनेर तालुक्यातील नदी काठावरील मांडळ व नीम, तांदळी, शहापूर, कळंबू, ब्राह्मणे, भिलाली, बोदर्डे या गावात पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
उघडीप नसल्याने पिके धोक्यात; पंचनामे सुरू
पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने हजेरी लावलेली असल्याने उघडीप मिळालेली नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहे. उडीद-मूगावर रोग पडू लागला असून कपाशीची रोपे पिवळी पडू लागली आहेत. याबाबत कृषी विभागाची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात तक्रार येईल, त्यानुसार पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या बंद
संततधार पाऊस तसेच पांझरा व तापी नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांच्या रजा, सुट्या रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हतनूरचे ४१ दरवाजे पूर्ण उघडले
हतनूर धरण क्षेत्रात पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून २ लाख ५१ हजार ५४९ क्युसेक्स वेगाने नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तापी नदी काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे गिरणा धरण ६१ टक्के तर वाघूर धरणातील जलसाठा ३४ टक्के इतका झाला आहे.

Web Title: Rainfall hits 4 villages; Flooding in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.