खान्देशात पावसाची विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:27 PM2019-08-10T22:27:24+5:302019-08-10T22:29:33+5:30
पूर ओसरले : उघडीपमुळे मिळाला दिलासा
जळगाव/ धुळे/ नंदुरबार : खान्देशात सुमारे आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विश्रांती घेतल्याने पूर ओसरले आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर सूर्यदर्शनही झाले. यामुळे सर्वाना दिलासा मिळाला असून नुकसानीच्या पंचनाम्यांचे कामही सुरु झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मृतांची संख्या तीन
नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीने शेकडो हेक्टर शेती आणि ५०० पेक्षा अधिक घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री चिखली, ता.धडगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने गणेश राजेंद्र पाडवी (वय ४) याचा मृत्यू झाला. यामुळे पावसाच्या थैमानातील मृतांची संख्या तीन झाली आहे. याशिवाय सहा जनावरे आणि ३० मेंढ्या मरण पावल्या आहेत.
साक्रीच्या एकाचा मृतदेह आढळला
धुळे जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला असून शनिवारी पावसाने विश्रांती घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला. तसेच आठवडाभरानंतर सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्याने विसर्ग कमी करण्यात आल्याने पांझरा, बुराई, अरुणावती आदी नद्यांचा पूर ओसरला आहे. पुरात वाहून गेलेल्यांपैकी शिरपूर येथील रशीद जमशेर मेहतर (५०) यांचा मृतदेह सापडला. तर सामोडे, ता.साक्री येथील गुलाब पांडुरंग घरटे (५७) यांचा शोध घेण्याचे काम प्रशासनातर्फे सुरूच आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून या कामास गती दिल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.
मुक्ताईनगरला सर्वाधिक तर चाळीसगावला सर्वात कमी पाऊस
जळगाव जिल्ह्यात शनिवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतीकामांची लगबग सुरु झाली असून शनिवारी शहरातील नागरिकांनी सकाळी काही वेळ उन दुपारी पाऊस आणि सावली असा श्रावणाचा अनुभव घेतला. शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने पासष्टी गाठली आहे़ जिल्हयात सर्वाधिक पाऊस मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के येथे नोंदविण्यात आला. यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१ तर सर्वात कमी पावसाची नोंद ४९ टक्के इतकी चाळीसगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पंचनामे सुरु झाले असून जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या चारपैकी अमळनेर तालुक्यात पंचनाम्यांची प्रतीक्षाच आहे. गुरुवारी अमळनेर, चोपडा, यावल व धरणगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली.